रक्तसाठ्याच्या एकत्रित माहितीचा अभाव; कोरोना प्लाझ्माची चणचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:33+5:302021-05-05T04:15:33+5:30
राजू इनामदार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील रक्तसाठ्याची एकत्रित माहितीच कुठे सहज उपलब्ध नाही. त्यामुळे रक्तपिशवी किंवा कोरोनामुक्त ...
राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील रक्तसाठ्याची एकत्रित माहितीच कुठे सहज उपलब्ध नाही. त्यामुळे रक्तपिशवी किंवा कोरोनामुक्त रुग्णाचा प्लाझ्मा उपचारांसाठी लागत असेल तर रक्तपेढी किंवा तिथे हवा तो रक्तगट नसेल तर मग रक्तदाता शोधत रुग्णाच्या नातेवाईकाला फिरावे लागत आहे.
शहरात एकूण रक्तपेढ्या किती, त्यांच्याकडे किती रक्तसाठा आहे, त्याचे गटनिहाय वर्गीकरण, कोरोनामुक्त रुग्णांच्या प्लाझ्माचा साठा किती याची एकत्रित माहिती किमान कोरोना आपत्ती काळात तर सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. पण पुणे शहराची अशी एकत्रित माहितीच महापालिका, ससून, किंवा अन्य सरकारी खात्याकडे नाही. रक्तपेढ्यांची मान्यता ज्यांच्याकडे आहे, त्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून रक्तसाठ्याची माहिती हवी असेल तर त्यासाठी असलेल्या संकेतस्थळावर जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
कोरोनामुक्त रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णावरील उपचारासाठी ऊपयुक्त ठरतो आहे. त्यामुळे या प्लाझ्माला मोठी मागणी आहे. तो रक्तातूनच वेगळा केला जातो. त्यामुळे अशा रुग्णांना रक्तदानासाठी आवाहन केले जात आहे. त्याला सार्वजनिक मंडळे, सेवाभावी संस्था यांच्याकडून चांगला प्रतिसाद आहे. सर्व रक्तपेढ्यांकडे रक्ताचा आता पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात येते. मात्र शहराची एकूण रक्तसाठा स्थितीही एकत्रितपणे कुठे मिळत नाही तर रक्तगटनिहाय वर्गीकरण दूरच राहिले.
कोरोना रूग्णाला रक्ताची नसली तरी प्लाझ्माची गरज भासते. सध्या शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज मोठी भर पडते आहे. बहुतांश रूग्णालयांकडून प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होतोच. मागील काही वर्षांत त्यांनी स्वतःच्या रक्तपेढ्या तयार केल्या आहेत. रुग्णालयाला गरज लागलीच तर ते स्वतःच्या पेढीतूनच रक्तपिशवी किंवा प्लाझ्माही घेतात. त्याचे दर ते त्यांंना हवे तेवढे लावतात.
कोरोना रुग्णांचेच नाही तर साध्या रुग्णांचे नातेवाईकही आधीच धास्तावलेले असतात. त्यात रक्तपिशवी किंवा प्लाझ्मा आणायला सांगितले की त्यांची धावपळ उडते. रक्तपेढीतही अनेकदा आवश्यक तो रक्तगट उपलब्ध नसतो किंवा त्यांचे दर परवडत नाहीत. अशा वेळी इतक्या गडबडीत आवश्यक गटाचा रक्तदाता शोधावा लागतो. प्लाझ्मासाठी तर सध्या ही धावपळ नको इतकी वाढली आहे. याची माहिती असूनही ही एकत्रित माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्याकडे सर्व संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
--//