अँटिजन किटची कमतरता, कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:10 AM2021-05-08T04:10:45+5:302021-05-08T04:10:45+5:30
आंबेगाव तालुक्यात मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात अँटिजन किटची कमतरता असल्याने तपासणीसाठी आलेल्या सर्वच नागरिकांची तत्काळ कोरोना चाचणी होत नाही. ...
आंबेगाव तालुक्यात मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात अँटिजन किटची कमतरता असल्याने तपासणीसाठी आलेल्या सर्वच नागरिकांची तत्काळ कोरोना चाचणी होत नाही. त्यामुळे तालुक्यात सुपरस्प्रेडरचे प्रमाण वाढू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आंबेगाव तालुक्यात मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय,अवसरी खुर्द येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड सेंटर व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी यापूर्वी अँटिजन कोरोना चाचणी होत होती. संशयितांची अँटिजन तपासणी होऊन तत्काळ पॉझिटिव्ह बाधितांना त्यांच्या आजारानुसार उपजिल्हा रुग्णालय किंवा कोविड सेंटर येथे भरती केले जात होते, तर काही रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा अहवाल दोन ते तीन दिवसांनी येत आहे. त्यामुळे अँटिजन चाचणी केली असता पॉझिटिव्ह रुग्ण तत्काळ ओळखून त्यांची काळजी घेतली जात असे. मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून अँटिजन किटची कमतरता भासत आहे. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या सर्वच नागरिकांची कोरोना चाचणी तत्काळ होत असली तरी वेळेत रिपोर्ट मिळत नाही. ज्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते, त्यांचा अहवाल दोन ते तीन दिवसांनंतर येत असल्याकारणाने पॉझिटिव्ह रुग्ण ओळखला जात नाही. कोरोना तपासणी केल्यानंतर संशयित रुग्ण घरी जात आहेत. दोन-तीन दिवस इतरत्र फिरल्यानंतर त्यांना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते. तोपर्यंत कोरोनाचा प्रसार मोठ्या संख्येने होतो.त्यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता वाढली आहे. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. ते आपली पॉझिटिव्ह चाचणी करण्यासाठी जात आहेत. मात्र चाचणी न झाल्यामुळे ते जर समाजात फिरले तर कोरोना आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. शासनाने तातडीने अँटिजन किट उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे खाजगी पॅथॉलॉजी लॅबवाले घरी जाऊन रुग्णांची कोरोना चाचणी करत असल्याचे निदर्शनास आले असून बहुतांश चाचण्यांचा अहवाल शासनापर्यंत पोहोचत नाही. खाजगी लॅबमुळे प्रशासन किंवा त्या गावातील ग्रामस्थांना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती उपलब्ध होत नाही. ज्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आहे, त्या घरातील अन्य व्यक्ती गावभर फिरत राहिल्याने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो.