आरोग्य विभागाच्या कामकाजात सुसूत्रतेचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:56 AM2018-08-28T02:56:33+5:302018-08-28T02:57:14+5:30
पदांवरून धुसफूस : शह-काटशहाचाचे राजकारण, अधिकारी नसल्याने कारभार बेभरवशाचा
राजू इनामदार
पुणे : आरोग्य विभाग हा महापालिकेतील सर्वाधिक कर्मचारी संख्या असलेला विभाग. मात्र, सर्व कामकाजाचे नियंत्रण करणारा प्रमुख अधिकारीच गेले सव्वा वर्ष नाही. त्यामुळे या कामात सुससूत्रताच राहिलेली नाही. पदांवरून अधिकाऱ्यांमध्ये कायमची धुसफूस सुरू असते. शह-काटशहाचेच राजकारण सुरू आहे. त्याचा परिणाम शहरातील आरोग्य सेवेवर होत आहे.
एक आरोग्य अधिकारी, ३ उपआरोग्य अधिकारी, ५ सहायक आरोग्य अधिकारी त्यानंतर उर्वरित वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर्स) अशी आरोग्य विभागाची सर्वसाधारण रचना आहे. त्यांच्यानंतर मग कर्मचारी (नर्स, आया, स्वच्छता कर्मचारी) आहेत. त्यांचीच संख्या १ हजार आहे. एखाद्या पदावरील कर्मचारी निवृत्त होण्याआधीच त्या पदावर कोणाला नियुक्त करायचे याची तयारी प्रशासनाकडून सुरू होत असते. या विभागात मात्र आरोग्यप्रमुख हे पद रिक्त होऊन वर्ष होऊन गेले तरीही त्यावर नियुक्ती व्हायला तयार नाही. आरोग्य प्रमुखपदांनंतरची उपआरोग्य प्रमुख पदाची तीन पदेही रिक्त होती. त्यामुळे त्यावरून आरोग्य अधिकारी पदावर हक्क सांगणारे कोणीही नव्हते.
काही सहायक आरोग्य अधिकाºयांनी सेवाज्येष्ठता, शैक्षणिक पात्रता याप्रमाणे हक्क सांगितला. मात्र सन २०१४मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने या पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेत बदल केला. आधी फक्त एमबीबीएस व डीपीएच (डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ) इतकाच निकष होता. पदानंतर तो एम.डी. असा करण्यात आला. या पदावर हक्क सांगणाºया अधिकाºयांमध्ये एम. डी. कोणीही नव्हते. जे होते ते सेवाज्येष्ठतेत कमी पडत होते. त्यातूनच मग या पदाचा कार्यभार द्यायचा कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला.
प्रशासनाने सरकारकडे त्यांनी अधिकारी पाठवावा अशी मागणी केली, मात्र ती अजूनही मान्य झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने सहायक आरोग्य अधिकाºयांकडे आरोग्य अधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार दिली. त्यात पुन्हा इतका मोठा व्याप एकाच सहायक आरोग्य अधिकाºयाला सांभाळता येणार नाही असे वाटून या एका विभागाचे दोन विभाग करण्यात आले. रुग्णालये व त्यांचे व्यवस्थापन व अन्य काही विभाग एका अधिकाºयांकडे व औषध वितरण, जन्ममृत्यू, व अन्य काही विभाग दुसºया अधिकाºयाकडे अशी रचना करण्यात आली. वैद्यकीय अधिकाºयांची बदली केली की नगरसेवकाचा दबाव आणणे, विशिष्ट ठिकाणी नियुक्तीसाठी आग्रही राहणे, एखादेच टेबल (कामाशी संबंधित, जसे की बिले मंजूर करणे, शहरी गरीब योजना पाहणे) कायमचे अडवून बसणे असे अनेक प्रकार दुसºया फळीतही आहेत. काही जण त्यासाठी इतके आग्रही आहेत की प्रकरणांवर स्वाक्षरी कोणी करायची यावरून मध्यंतरी भर दुपारी कार्यालयातच दोन डॉक्टरांमध्ये भांडणे झाली.
मर्यादा आहेत, पण सुधारणा सुरू आहेत
आरोग्य विभागाचा व्याप बराच मोठा आहे व त्यावर नियंत्रणासाठी तिथे आरोग्य अधिकारी हे पद असणे गरजेचेच आहे. सरळ सेवा भरती किंवा पदोन्नती यात काही अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही त्या पदासाठी सरकारकडे मागणी करत आहोत. महापालिकेची आरोग्य सेवा ही शहरातील फार मोठ्या लोकसंख्येची गरज आहे. ही गरज भागत आहे. रोज ८ ते १० हजार नागरिक ओपीडींमधून वैद्यकीय सेवा घेत असतात. औषध खरेदी, वितरण, पदांची अपुरी संख्या, कामकाजाच्या वेळा अशा त्रुटी आहेत. त्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. अधिकाºयांमध्ये विसंवाद असेल व तो आढळला तर त्यावर कारवाई केली जाते. या सेवेत सुधारणा व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकरण याचा वापर करण्यात येणार आहे.
- शीतल उगले-तेली, अतिरिक्त आयुक्त, महापालिका