बालेवाडी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये सोयी सुविधा आणि स्वच्छतेचा अभाव; नागरिकांकडून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:42 PM2020-07-18T20:42:34+5:302020-07-18T20:43:33+5:30
अनेक नागरिकांना आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही याबाबत कल्पना देण्यात आलेली नाही..
पाषाण : पुणे शहरातील विविध भागातून कोरोना बाधित असलेले रुग्ण तसेच क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिक यांच्या वर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने निकमार कॉलेजमध्ये सेंटर उभारण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने बालेवाडी येथे तयार करण्यात आलेले निकमार कॉलेजमधील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत योग्य माहिती न मिळाल्याने संताप व्यक्त करत आहेत. तसेच योग्य सुविधा मिळत नसल्याने या सेंटरवर असलेले अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे बरे होऊन बाहेर पडलेल्या काही नागरिकांनी देखील सुविधांबाबतच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अनेक नागरिकांना आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही याबाबत कल्पना देण्यात आलेली नाही. तर कोणतीही लक्षणे आढळत नसलेल्या लोकांना देखील या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याची तक्रार नागरिक करत आहे. काही नागरिकांना फक्त तोंडी कोरोना झाला असल्याचे सांगितले जात आहे. नागरिक त्यांचे टेस्टचे रिपोर्ट मिळावेत अशी मागणी करत आहेत.
निकमार सेंटरमध्ये नागरिकांना प्यायला गरम पाणी दिले जात नाही तर अनेक नागरिक आपल्या नातेवाइकांकडून गरम पाणी आणत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आंघोळीला गरम पाणी नसल्याने थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. यामुळे सर्दी खोकला यासारखे देखील वाढत असल्याचे काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. जेवणाची गुणवत्ता याबाबत देखील अनेक नागरिक तक्रार करतात. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. परिसराच्या स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करून देखील कारवाई केली जात नाही तसेच रुग्णांना देण्यात आलेल्या खोल्यांची स्वच्छता देखील वेळेवर होत नाही.खोलीमध्ये दररोज आरोग्य तपासणी व्हावी स्वच्छता तसेच साफसफाई नियमित केली जावी व गरम पाणी देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
क्वारंटाईन असलेले धनराज मोरे म्हणाले, आमची टेस्ट केल्यानंतर आम्हाला करून झाला आहे असे सांगून सेंटरमध्ये करण्यात आले आहे. परंतु येथे आल्यानंतर देण्यात आलेल्या रूमची स्वच्छता करण्यात आली नव्हती. गुणवत्ता पूर्ण जेवण दिले जात नाही दररोज चेक देखील केले जात नाही. आजारी पडलेल्या रुग्णांना स्वतः खाली डॉक्टरांकडे जावे लागते. क्वारंटाईन केलेले नागरिक व रुग्ण यांची दररोज आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे असे असताना देखील आरोग्य तपासणी होत नाही.
सहाय्यक आयुक्त जयदीप पवार म्हणाले, वाढत असलेल्या पेशंटची संख्या यामुळे यंत्रणेवरील ताण वाढत आहे. समस्या लक्षात आल्यानंतर तात्काळ उपाय योजना करण्यात येत आहे.