पूर्व हवेलीतील पुणे-सोलापूर महामार्गावरील पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:28 AM2021-02-20T04:28:05+5:302021-02-20T04:28:05+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावर वेगवेगळ्या कंपन्यांचे पेट्रोल पंप आहेत. या पेट्रोलपंपांची पाहणी केली असता अनिवार्य सेवा देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. ...
पुणे-सोलापूर महामार्गावर वेगवेगळ्या कंपन्यांचे पेट्रोल पंप आहेत. या पेट्रोलपंपांची पाहणी केली असता अनिवार्य सेवा देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. पेट्रोल पंपावर मोफत हवा देणे बंधनकारक आहे. ग्राहक पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी गेल्यानंतर तो गाडीत मोफत हवा भरून घेऊ शकतो. परंतु अनेक पेट्रोलपंपांवर मोफत हवा भरून देण्याची सोय नाही. काही ठिकाणी हवा भरण्यासाठी मशिन बसविण्यात आल्या आहेत. परंतु ते मशिन बंद असल्याचे दिसते. बंद पडलेल्या मशिनजवळील जागा पेट्रोल पंपचालकांनी पंक्चर काढणाऱ्यांना दिल्या आहेत. त्या ठिकाणी मोफत हवा भरून देण्यात येत नाही. त्याठिकाणी दुचाकी चालकांकडून हवा भरण्याचे दहा रुपये, कारचालकांकडून वीस रुपये घेतले जातात. प्रत्येक पेट्रोलपंपावर पिण्याच्या पाण्याची सोय करणे बंधनकारक आहे. परंतु बहुतांश पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणे बंधनकारक आहे. काही पेट्रोल पंपांवर स्वच्छतागृह आहेत. परंतु त्यामध्ये पाण्याची सोय नाही. त्यामुळे स्वच्छतागृह असून ते केवळ दाखविण्यासाठीच असल्याचे दिसून येत आहे.
तक्रार पुस्तक नाही
पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याचा नंबर लिहिणे आवश्यक असते. ग्राहकाची काही तक्रार असल्यास थेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून तक्रार करता येते. त्याचबरोबर तक्रारी पुस्तिकाही पेट्रोलपंपावर उपलब्ध नसते.
--
प्रथमोपचार पेटीही नाहीच
सुविधांचा अभाव
प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रथमोपचार पेटी (फर्स्ट एड बॉक्स) ठेवणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान गरज पडल्यास पेट्रोलपंपावर उपलब्ध असलेल्या फर्स्ट एड बॉक्सचा वापर करून प्रथमोपचार केला जाऊ शकतो. परंतु बऱ्याच पेट्रोलपंपावर फर्स्ट एड बॉक्स ठेवण्यात आल्याचे दिसून आले नाही. तसेच महामार्गावरील अनेक पेट्रोलपंपावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे रात्री-अपरात्री प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.