विद्यापीठ पदवी प्रदान समारंभात नियोजनाचा अभाव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:15 AM2021-06-16T04:15:37+5:302021-06-16T04:15:37+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या मंगळवारी (दि.१५)ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या मंगळवारी (दि.१५)ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाची सुधारित निमंत्रण पत्रिका सोमवारी तयार करून त्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे नाव छापण्यात आले. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी अचानक दुसरी निमंत्रण पत्रिका तयार केल्यामुळे या कार्यक्रम नियोजनात आभाव असल्याची चर्चा आहे.
विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन या पदवीप्रदान समारंभास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख असणारी कार्यक्रम पत्रिका सुरुवातीला छापून वितरित करण्यात आली. परंतु, सोमवारी शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे नाव असलेली दुसरी कार्यक्रम पत्रिका विद्यापीठाकडून पाठविण्यात आली. उदय सामंत यांना पाठविलेल्या निमंत्रणाची त्यांनी सोमवारी औपचारिक मान्यता दिली असून, ते या कार्यक्रमास ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती राहणार आहेत, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यातच परीक्षा विभागाचा कार्यक्रम असला तरी या कार्यक्रम पत्रिकेत परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकांचे नाव छापले जात नाही. त्यामुळे परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तब्बल १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून पोस्टाने घरपोच पदवी प्रमाणपत्र पाठवले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी करू नये, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
---------
राज्यातील काही विद्यापीठांमध्ये पदवीप्रदान समारंभाच्या कार्यक्रम पत्रिकेत परीक्षा नियंत्रकांची नाव छापले जाते. परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा नियंत्रकांच्या नाव छापण्याची परंपरा नाही.
- शिवाजीराव अहिरे, माजी परीक्षा नियंत्रक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ