पर्यावरणाबाबत सकारात्मकतेचा अभाव
By Admin | Published: January 2, 2017 02:32 AM2017-01-02T02:32:27+5:302017-01-02T02:32:27+5:30
आपण दररोज प्रदूषणामध्ये भर घालत आहोत. या प्रदूषणाचे चटके पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत.
पुणे : ‘आपण दररोज प्रदूषणामध्ये भर घालत आहोत. या प्रदूषणाचे चटके पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. परंतु, त्याचा आपण गांभीर्याने विचार करत नाही. विचार योग्य नसल्याने आपल्याकडून त्या प्रकारची सकारात्मक कृती होत नाही आणि निसर्गाचा ऱ्हास सुरूच आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले.
डॉ. श्री. द. महाजन यांच्या ‘निसर्गभान’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अवचट यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र शेंडे, पराग महाजन, नंदू कुलकर्णी उपस्थित होते.
अवचट म्हणाले, ‘‘बदलत्या सामाजिक आणि औद्योगिकरणामुळे निरनिराळ्या प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. आपण केवळ वायू, जल आणि ध्वनी या प्रदूषणांवरच लक्ष केंद्रित करीत आहोत. या सर्वांच्या मुळाशी मानवाच्या वैचारिकतेमध्ये झालेले प्रदूषण कारणीभूत आहे.’’
केतकी घाटे यांनी सूत्रसंचालन केले. नंदू कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. दीप्ती सिधये आणि डॉ. श्री. द. महाजन यांनी या वेळी निसर्ग कविता सादरीकरण केले. डॉ. स्वाती गोळे, प्रकाश गोळे, विवेक महाजन, डॉ. पराग महाजन, पराग साळसकर, आनंद लोखंडे, स्वानंद देशपांडे, डॉ. रमेश गोडबोले यांचा सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)