उदयोन्मुख कलाकारांचा रियाझ कमी : अशोक पत्की; पुण्यात वि. वि. द. स्मृती समारोह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:34 PM2017-12-20T12:34:24+5:302017-12-20T12:39:36+5:30

तंत्रज्ञानामुळे कष्ट कमी झाले आहेत, त्यामुळे गाण्याची तळमळ कमी झाली आहे. उदयोन्मुख कलाकारांचा रियाझही कमी पडत आहे,’’ अशी खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.

lack of practice in Emerging Artists : Ashok Patki; v. v. d. smruti samaroh in pune | उदयोन्मुख कलाकारांचा रियाझ कमी : अशोक पत्की; पुण्यात वि. वि. द. स्मृती समारोह

उदयोन्मुख कलाकारांचा रियाझ कमी : अशोक पत्की; पुण्यात वि. वि. द. स्मृती समारोह

Next
ठळक मुद्देशिष्य कायमच गुरूंच्या अस्तित्वाचा भाग असतात : अशोक पत्कीमाझ्याकडून संगीताची निस्सीम सेवा घडण्यासाठी प्रयत्न करेन : सुरश्री जोशी

पुणे : ‘‘शास्त्रीय संगीताबद्दल बोलण्याचा मला अधिकार नाही. मात्र, आजकाल सुगम संगीताच्या बाबतीत परिस्थिती बिघडत चालली आहे. पूर्वीप्रमाणे आता संगीताविषयी आस्था राहिलेली नाही. तंत्रज्ञानामुळे कष्ट कमी झाले आहेत, त्यामुळे गाण्याची तळमळ कमी झाली आहे. उदयोन्मुख कलाकारांचा रियाझही कमी पडत आहे,’’ अशी खंत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.
गांधर्व महाविद्यालयात पं. विष्णू दिगंबर पलूसकर, पं. विनायकराव पटवर्धन आणि पं. द. वि. पलूसकर या तीन दिगग्ज गुरूंच्या नावातील आद्याक्षरांपासून सुरू करण्यात आलेल्या वि. वि. द. स्मृती समारोहामध्ये मंगळवारी पं. उल्हास कशाळकर यांना पं. विष्णू दिगंबर पलूसकर स्मृती गुरुगौरव पुरस्कार, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना पं. विनायकराव पटवर्धन संगीत जीवनगौरव पुरस्कार, हार्मोनिअमवादक सुयोग कुंडलकर यांना गोविंदराव टेंबे संगीतकार पुरस्कार, गायिका सुरश्री जोशी यांना रामकृष्णबुवा वझे पुरस्कार मठाचे मठाधिपती श्रीकांत आंनद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी तालयोगी पं. सुरेश तळवलकर, संस्थेचे अध्यक्ष रवी परांजपे, प्राचार्य प्रमोद मराठे उपस्थित होते. 
पत्की म्हणाले, ‘‘गुरूंनी मला केवळ शागीर्द म्हणून कधीच शिकवले नाही. शिष्य कायमच गुरूंच्या अस्तित्वाचा भाग असतात. संगीताची साधना करत असताना गायनामध्ये माधुर्य निर्माण होणे गरजेचे असते. जडणघडण होत असताना स्वत:च स्वत:चे गुरू होणे आवश्यक आहे.’’ 
सुरश्री जोशी म्हणाल्या, ‘‘गुरूंच्या कृपेने मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यामुळे आजवरचा प्रवास झाला असून यापुढेही माझ्याकडून संगीताची निस्सीम सेवा घडण्यासाठी प्रयत्न करेन.’’
सुयोग कुंडलकर म्हणाले, ‘‘गोविंदराव टेंबे यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. मला कलेची कोणतीही पार्श्वभूमी नाही. तरीही आई-वडिलांनी कायम प्रोत्साहन दिले. गुरू अरविंद थत्ते यांचा मी कायम ऋणी राहीन. माझ्या बरोबरीने साथसंगत करणारे सहकलाकार, वाद्य कारागीर आणि रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यांच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावरच पुढचा प्रवास करायचा आहे.’’
श्रीकांत आनंद म्हणाले, ‘‘संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी महान कार्य केले.’’ 
उत्तरार्धात पं. उल्हास कशाळकर यांचे गायन झाले. त्यांनी हमीर रागातून ग्वाल्हेर घराण्याच्या गायनाचे दर्शन घडवले. कसदार आवाज, सुरावटीतून त्यांनी मैफिलीत रंग भरले. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकर, हार्मोनिअमवर सुयोग कुंडलकर, तानपुºयावर साई महाशब्दे आणि सौरभ नाईक यांनी साथसंगत केली.

मला घडवण्यासाठी गुरूंनी कमालीची मेहनत घेतली. संगीताचा एकेक धडा बारकाईने गिरवून घेतला. त्यामुळे आता बंदिश, तराणा यांचे महत्त्व कळते. तारीफ करायचीच असेल, तर ती गुरूंची व्हायला हवी. त्यांच्याकडूनच मला विशुद्ध कलेचे दर्शन घडले.
- पं. उल्हास कशाळकर 
 

Web Title: lack of practice in Emerging Artists : Ashok Patki; v. v. d. smruti samaroh in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे