सुप्यात युरियाचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:35+5:302021-07-20T04:08:35+5:30
सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके घेतलेली आहेत. तसेच या पिकांची खुरपणीसुद्धा झालेली आहे. तसेच ऊस, मका आणि बाजरी आदी ...
सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके घेतलेली आहेत. तसेच या पिकांची खुरपणीसुद्धा झालेली आहे. तसेच ऊस, मका आणि बाजरी आदी पिकांच्या वाढीसाठी युरियाची आवश्यकता आहे. मात्र मागील आठवड्यापासून युरियाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. येथील कृषी केंद्रांवर त्वरित युरिया उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जून महिन्यापासून आत्तापर्यंत सुमारे ३ हजार टन युरिया तालुक्यात वितरीत केला आहे. तसेच मागील आठवड्यात बफर स्टॉकमधून बारामती तालुका खरेदी विक्री संघाला २२५ टन युरिया दिलेला आहे. त्यातच १०० टन युरिया हा जिरायती भागासाठी दिलेला आहे. तसेच नीरा खरेदी संघाला युरिया दिलेला आहे. त्यामुळे संघाने जिरायती भागाच्या मागणीनुसार त्या त्या भागात युरियाचे वितरण करण्याची आवश्यकता असल्याची माहिती पडवळ यांनी दिली. तर खरेदी विक्री संघाचे महाव्यवस्थापक नीलेश लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सुप्यात रविवारी (दि. १८) २० टन युरियाची गाडी पाठवली तर दोन दिवसांत १० टन युरियाची गाडी पाठवली जाईल. त्यामुळे यापुढे युरियाचा तुटवडा भासू नये याची दक्षता घेतली जाईल.