जिल्ह्यात पाण्याअभावी भातशेती संकटात, खाचरे कोरडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:55 AM2018-10-15T01:55:16+5:302018-10-15T01:55:28+5:30
पिकांवर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाकडून पाहणीचे आदेश
डिंभे : भातशेतीचे आगर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर या तालुक्यातील भातशेती हंगामाच्या अंतिम टप्प्यावर संकटात सापडली आहे. भातखाचरे कोरडी पडू लागल्याने भातउत्पादक हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील हजारो लोकसंख्येच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाणारी सुमारे ६८ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती होते.
जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर हे तालुके प्रामुख्याने भातशेतीचे आगर म्हणून ओळखले जातात. दरवर्षी या तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर भातशेती होते. विशेषत: आदिवासी जनतेच्या जीवनाचा भातशेती मुख्य आधार मानली जाते. उदरनिर्वाहासाठी आवश्यक उत्पादन पदरी ठेवून या भागातील शेतकरी तांदूळविक्रीतून आपल्या गरजा भागवीत असतो. शहरी भागातील तांदळाची गरज भागविली जाते.
इंद्रायणी, रायभोग, जिर, आंबेमोहर, कोलम, कोळंबा या पारंपरिक जातीचे उत्पादन घेतले जाते. यंदाही या भागातील भातउत्पादक जोमाने कामाला लागला होता. सुरुवातीपासून भातशेतीसाठी पूरक हवामान व पाऊस राहिल्याने समाधानी होता. पेरणीसाठी काही ठिकाणी पावसाची वाट पाहावी लागली तरी काहींनी धूळपेरणी केली होती. मात्र यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने सर्व पेरण्या कारणी लागल्या होत्या. उलटपक्षी लागवडी वेळेत उरकल्याने समाधान होते. मात्र ऐन भातशेती जोम धरण्याच्या काळात असतानाच महिन्याभरापासून पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी तर दीड महिना पावसाने हजेरी लावली नाही. परतीचा पाऊसही झाला; मात्र पूर्व भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने भातशेतीला फायदा झाला नाही. भातशेतीला सध्या मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. महिना-दीड महिन्यापासून भातखाचरे कोरडी पडल्याने भातशेती पिवळी पडू लागली आहे. अनेक ठिकाणी करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हातातोंडाशी येऊ लागलेले पीक हातचे जाते की काय, या भीतीपोटी शेतकरीवर्गामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
आंबेगाव तालुक्यातील शेतकºयांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, ‘‘हंगामाच्या सुरुवातीला भरपूर पाऊस झाल्याने यंदा खंडीची पेंडी होईल, अशी आशा होती. पण आसळकाचा पाऊस झालाच नाही. वाहन घोडा असल्याने तो घोड्यासारखाच निघून गेला. पुढे मघा, पूर्वा या सासू-सुनांचा पाऊसही रुसव्या-फुगव्यासारखाच झाला. नवचंडीत पावसाची कृपा झाल्यास निम्मे अर्धे उत्पादन हाती लागण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या तरी पाऊस नसल्याने हंगाम वाया चालला आहे.’’