...म्हणून कचराडेपोमध्ये केले हळदी कुंकू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 03:28 PM2019-02-13T15:28:11+5:302019-02-13T15:33:50+5:30
स्वछतेच्या मानांकनात मागील वर्षी लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आहे. सध्या लोणावळा शहर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त असून घरोघरचा कचरा घंटागाडीत ओला व सुका असे वर्गीकरण करुन गोळा केला जातो.
पुणे : लोणावळा शहर व परिसरातील ग्रामीण भागात राहणार्या महिलांना स्वच्छतेचे आणि कचरा वर्गीकरणाचे महत्व पटावे म्हणून लोणावळ्यात चक्क महिलांनी कचराडेपोमध्ये हळदी कुंकू समारंभ साजरा केला. लोणावळा नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती तसेच प्रगती महिला नागरी सह पतसंस्था यांच्यावतीने रथसप्तमी निमित्त वरसोली येथील कचरा डेपोवर हळदी कुंकू समारंभ पार पडला.
सुमारे पाच ते सहा हजार महिलांनी हळदी कुंकू समारंभा व्यतिरिक्त प्रत्यक्षात कचराडेपोवरील कामकाजाची माहिती घेतली. स्वछतेच्या मानांकनात मागील वर्षी लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आहे. सध्या लोणावळा शहर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त असून घरोघरचा कचरा घंटागाडीत ओला व सुका असे वर्गीकरण करुन गोळा केला जातो. मात्र हा कचरा वर्गीकरण करुन का द्यावा, कचर्याचे पुढे काय होते याबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न होते. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी थेट कचरा डेपोमध्येच हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.
याबाबत नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या की, 'लोणावळा शहरात मागील दोन वर्षापासून स्वच्छतेचा जागर सुरु आहे. यासाठी ह्या आगळ्या वेगळ्या हळदी कुंकु समारंभाचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील हा पहिलाच वेगळा उपक्रम असून याठिकाणी महिलांना ओल्या कचर्यापासून बायोगॅस निर्मिती कशी केली जाते तसेच सुक्या कचर्यापासून खत कसे बनविले जाते याबाबतची माहिती देण्यात आली.
यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुर्वणा अकोलकर, उपसभापती गौरी मावकर, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती संध्या खंडेलवाल, माजी सभापती बिंद्रा गणात्रा, पुजा गायकवाड, काॅग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर, मंदा सोनवणे, रचना सिनकर, जयश्री आहेर, प्रगती नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा पार्वती रावळ, उपाध्यक्षा रसवंती मानकामे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शैलजा फासे यांनी येणार्या महिलांना स्वच्छतेची माहिती देत स्वागत केले.