'लाडकी बहीण योजना राबवतायेत, पण महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही', शरद पवारांचा युतीवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 01:56 PM2024-11-15T13:56:36+5:302024-11-15T13:57:01+5:30
राज्यात महिलांसाठी आणलेल्या लाडकी बहिण योजनेला हरकत नाही, परंतु सध्या वस्तुस्थिती वेगळी आहे
पुणे: राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहे. दर तासाला ५ महिलांवर अत्याचार होत आहेत. ६४ हजार मुली , महिला बेपत्ता आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहे, पण सध्याच्या राज्यकर्त्यांना महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही.
देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे पण आजचे राज्यकर्ते त्याबाबत काहीच करत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते .
नेमक काय म्हणाले,'शरद पवार'
लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला ४०० खासदार निवडून द्या असे सांगत होते. कारण त्यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्य घटना बदलायची होती. देशातील आमच्या सवे घटक पक्षांनी एकत्रित लोकसभा निवडणूक लढविली. महाराष्ट्र ४८ खासदारापैकी ३oखासदार महाविकास आघाडीचे आले. त्यामुळे भाजप घटक पक्ष ४००चा आकडा गाठू शकले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेला धन्यवाद दिले पाहिजे.
दोन वर्षात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार
राज्यात महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली. त्याला हरकत नाही . महिलांच्या सन्मानाचा आनंदच आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. पण राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दोन वर्षात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झाले आहेत.याचाच अर्थ दर तासाला ५ महिलांवर अत्याचार होत आहेत. ६४ हजार मुली , महिला बेपत्ता आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नागपूर मध्ये 13 हजार महिला गायब आहेत. असेही शरद पवार यांनी सांगितले
राज्यात 20 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही वाढल्या आहेत. शेतीमालाला किंमत मिळत नाही बी बियाणे खते यांच्या किमती वाढल्या आहेत . त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. बँके वाले जप्ती करतात त्यामुळे बेइज्जतीहोते त्याचा परिणाम आत्महत्यांमध्ये होत आहे . राज्यात 20 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत गेल्या सहा महिन्यात १२६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत मे महिन्यात 206 तर जून महिन्यात 193 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे असे शरद पवार यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्याला पुन्हा एक क्रमांकाचे राज्य बनवायचा असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आवाहनही त्यांनी केले.