Diwali Faral: लाडू चिवडा चकली, करंजी आता थेट घरी; घरगुती स्वरूपातील तयार फराळाला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 09:55 AM2023-11-02T09:55:23+5:302023-11-02T09:55:37+5:30
दुकानातून फराळ घेण्यापेक्षा घरगुती महिला व्यावसायिकांकडे फराळ बुकिंग सुरु
पुणे : दिवाळीसाठी घरात कितीही तयारी करा, परंतु फराळाशिवाय ती अपूर्णच आहे. लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी, अनारसे, शेव, करंजी या पदार्थांमुळे दिवाळीची रंगत खऱ्या अर्थाने द्विगुणित होते. प्रत्येकाच्या घरात फराळ तयार करण्याची परंपरा आहे. गृहिणींकडून त्याची तयारी दिवाळीच्या कितीतरी दिवस आधीपासूनच सुरू होते.
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आता असा फराळ तयार करण्यासाठी गृहिणींकडे वेळच नाही. रोजचा स्वयंपाक करण्यासाठी वेळेची अडचण तिथे फराळ तयार करण्यासाठी म्हणून वेळ मिळणार तरी कधी? दिवाळी तर साजरी करायची आहे, पण फराळ तयार करण्यासाठी वेळ नाही या स्थितीवर तयार फराळाचा उपाय मिळाला आहे. घरगुती चवीसारखा तयार फराळ आता ठिकठिकाणी मिळतो.
मोठ्या कंपन्यांही आता तयार फराळाच्या बाजारपेठेत उतरल्या आहेत, मात्र तरीही घरगुती स्वरूपात तयार करण्यात आलेल्या फराळालाच मागणी आहे. यातून अनेक महिला खाद्यपदार्थ निर्मिती व्यवसायात लघुउद्योजक म्हणून पुढे येत आहेत, तर हाताला चव असणाऱ्या अनेक गरीब, होतकरू महिलांना रोजगार मिळाला आहे. एक मोठी बाजारपेठच पतीपत्नी दोघेही काम करण्याच्या नव्या जीवनशैलीमुळे तयार झाली आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत असल्याचे दिसते आहे.
तयार फराळाचे बुकिंग बरेच आधीपासून करावे लागते. लाडू, करंजी, चिवडा, शेव, शंकरपाळे अशा नेहमीच्या पदार्थांबरोबरच अनारसे, चिरोटे वगैरे खास पदार्थही तयार फराळात मिळतात. यातील अनारसे वगैरेसारख्या पदार्थांना तर थेट परदेशातूनही मागणी असते असे काही महिला व्यावसायिकांनी सांगितले. नोकरदार महिलांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते, त्याचबरोबर नव्या पिढीतील मुलींना असे पदार्थ तयार कऱण्याची काहीच माहिती नसते. त्यांच्याकडूनही तयार फराळ मागविला जातो असे या महिलांनी सांगितले.
ऑनलाइन फराळाचे पदार्थ खरेदी करणारेही आता वाढत चालले आहेत. घरात बसून फक्त मागणी नोंदवायची, काही तासातच तयार फराळ घरात हजर असेही होत आहे. कुरिअर, पोस्टाच्या माध्यमातून परदेशात फराळ पाठवणेही सोपे झाले आहे. दिवाळीला आता अवघे काही दिवसच राहिल्याने तयार फराळांच्या पदार्थाचा सुवास आता दरवळू लागला आहे. दिवाळीची चाहूल त्यातून मिळते आहे.
घरगुती फराळाचे दर (प्रतिकिलो)
अनारसे (तुपातला)- ६५० रुपये
बेसन लाडू (तुपातला) - ३५० ते ५०० रुपये
शंकरपाळी (गोड आणि खरी)- ३५० ते ४०० रुपये
करंजी - ४०० ते ५०० रुपये
चिवडा (पातळ पोह्यांचा) - ३५० ते ४५० रुपये
चकली - ५०० ते ६०० रुपये
आजकाल सगळेच आरोग्याबाबत बरेच जागरूक झाले आहेत. त्यामुळे बाहेरचा फराळ कोणत्या तेलात केला जातो, कशा पद्धतीने केला जातो याची माहिती घेऊन नंतरच मागणी नोंदविली जाते. परदेशातूनदेखील यासाठी मागणी करता. नवरात्राच्या आधीपासून बुकिंग सुरू होते. दिलेल्या तारखेला सर्व साहित्य देणे या व्यवसायात फार महत्त्वाचे आहे. - गायत्री पटवर्धन (घरगुती फराळ व्यावसायिक)