महिला प्रशासन अधिकाऱ्याला संत तुकारामनगरात शिवीगाळ
By admin | Published: May 24, 2017 04:12 AM2017-05-24T04:12:26+5:302017-05-24T04:12:26+5:30
संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या करसंकलन कार्यालयातील महिला प्रशासन अधिकाऱ्याला एका शिपायाने शिवीगाळ करून दमबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या करसंकलन कार्यालयातील महिला प्रशासन अधिकाऱ्याला एका शिपायाने शिवीगाळ करून दमबाजी, धक्काबुक्की करण्याचा प्रकार आज घडला. मात्र, तक्रार द्यायला गेलेल्या महिलेला राजकीय नेत्याने फोन करून दबाव टाकल्याने तक्रार दाखल झाली नाही. याबाबत महापालिका सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
महापालिकेचे संत तुकारामनगर येथे करसंकलन कार्यालय आहे. त्या ठिकाणी कामावर असलेल्या महिला प्रशासन अधिकाऱ्याने सकाळी अकराच्या सुमारास एका शिपायाला कामाविषयी विचारणा केली. काल सांगितलेले काम केले नाही, अशी विचारणा करून झापले. त्यामुळे चिडलेल्या शिपाई आणि महिला अधिकाऱ्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्या शिपायाने अर्वाच्य शिवीगाळ केली. अंगावर धावून गेला. हा प्रकार पाहून कार्यालयातील अन्य सहकारी दाखल झाले. त्या वेळीही संबंधित शिपाई महिला अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जात होता. त्याने धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित अधिकारी दमबाजी आणि धक्काबुकीची तक्रार करण्यासाठी महापालिका भवनात दाखल झाली. प्रशासन आणि कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात जाण्यापूर्वीच त्यांना कोणाचा तरी दूरध्वनी आला आणि ती महिला तक्रार न करताच परतली.
याबाबत पोलीस किंवा महापालिकेत कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, ‘‘संबधित ठिकाणी घडलेला प्रकार हा किरकोळ होता. तो सामंजस्याने मिटला आहे.’’