खटल्याचा निकाल मनाविरुध्द गेल्यास न्यायालयात विष पिण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 09:20 PM2019-02-25T21:20:26+5:302019-02-25T21:23:02+5:30
खटल्याचा निकाल मनाविरुध्द गेल्याने चक्क न्यायालयातच विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा एका महिलेने दिल्याने शिवाजीनगर न्यायालयात खळबळ उडाली.
पुणे : खटल्याचा निकाल मनाविरुध्द गेल्याने चक्क न्यायालयातच विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा एका महिलेने दिल्याने शिवाजीनगर न्यायालयात खळबळ उडाली. याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात महिलेवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत कनिष्ठ लिपीक सविता लाठे यांनी शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दिली आहे. फिर्यादी या लिपीक आहेत. तर, यातील महिला गणेश पेठेतील आहे. त्यांचा न्यायालयात खटला सुरू आहे. अंतिम निकाल सोमवारी लागणार होता. दुपारी ही महिला फवारणीची तसेच किटक नाशक मारण्याचे औषध घेऊन लाठे यांच्याजवळ आली. तसेच, आजचा निकाल माझ्या विरोधात गेल्यास मी विषारी औषध घेऊन आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. तिने आणलेले विषारी औषधही दाखविले. यामुळे काही काळ चांगलाच गोेंधळ उडाला. तत्काळ पोलीसांना बोलविण्यात आले. यानंतर लाठे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलीसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोेंद केली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक कोपनर यांनी दिली.