मोफत साडीच्या मोहापायी गमावले २५ हजारांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 08:42 PM2018-07-26T20:42:34+5:302018-07-26T20:43:22+5:30
साड्या हा महिलांचा वीक पॉर्इंट हे नेहमीच दिसून येते़ त्यात एखादा साड्या फुकट साड्या देतो, म्हटल्यावर भल्या भल्यांना त्याचा मोह सोडता सोडवत नाही़ या मोहापायी एका महिलेला आपल्याकडील २५ हजार रुपयांचे दागिने गमावण्याची वेळ आली आहे़
पुणे : साड्या हा महिलांचा वीक पॉर्इंट हे नेहमीच दिसून येते़ त्यात एखादा साड्या फुकट साड्या देतो, म्हटल्यावर भल्या भल्यांना त्याचा मोह सोडता सोडवत नाही़ या मोहापायी एका महिलेला आपल्याकडील २५ हजार रुपयांचे दागिने गमावण्याची वेळ आली आहे़ साड्या देण्याचा बहाणा करुन हातचलाखीने २५ हजारांचे दागिने लंपास करण्याची घटना मुकुंदनगर येथे मंगळवारी सायंकाळी चार वाजता घडली़
याप्रकरणी एका ४४ वर्षांच्या महिलेने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सुजय गार्डन येथून पर्वती दर्शन येथे मंगळवारी सायंकाळी त्यांच्या घरी जात होत्या. त्या फोटो इमेज दुकानासमोर आल्यावर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना आवाज दिला. त्यांना मी या सोसायटीत राहण्यास असून घर खाली करणार आहे. माझ्याकडे साड्या आहेत़ तुमच्या आधी एका मावशीला मी साड्या दिल्या आहेत. तुम्हालाही साड्या देतो म्हणत त्यांचा विश्वास संपादन केला़ त्यांच्या अंगावरील सोन्याची वेल आणि कानातील टॉप जोड हातात ठेवा, असे सांगितले़ साड्या मिळणार असल्याने त्यांनी त्याने सांगितल्याप्रमाणे अंगावरील दागिने काढून त्याच्या हातात ठेवले़ त्याने आपल्याजवळील रुमालात काहीतरी बांधून पुन्हा त्यांच्या हातात दिले़ त्यानंतर त्याने वेल जोड व कानातील टॉप जोड १०० रुपयांच्या नोटेमध्ये बांधून त्यांच्या हातात दिल्याचे भासवले. साड्या घेऊन येतो, असे सांगून तो निघून गेला़ त्या वाट पहात तेथे थांबल्या़ त्यांनी नोट उघडून पाहिले असता त्यात सोन्याचे दागिने नव्हते. त्यामुळे महिलेची फसवणूक झाल्याचे लक्षात आले तोवर तो निघून गेला होता. त्यानंतर महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.