बोगस डॉक्टर शोध समिती बैठकीला लागेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:26 AM2019-02-27T01:26:35+5:302019-02-27T01:26:39+5:30
द्विसदस्यीय समितीच उदासीन : ४ महिन्यांपासून आयुक्तांसोबतच भेट नाही
पुणे : एकीकडे शहरामध्ये बोगस डॉक्टरांची संख्या वाढत चाललेली असताना त्यावर अंकुश ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलेली द्विसदस्यीय समितीच उदासीन असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या ‘बोगस डॉक्टर शोध समिती’ची गेल्या चार महिन्यांत एकही बैठक झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्वत: महापालिका आयुक्त अध्यक्ष असलेली समितीच बोगस डॉक्टरांबाबत किती ‘जागरूक’ आहे याचा प्रत्यय येत आहे.
शासनाच्या निर्देशांनुसार बोगस डॉक्टर शोध समितीची स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त असतात, तर सदस्य सचिव म्हणून पालिकेचे आरोग्यप्रमुख यांची पदसिद्ध नेमणूक असते. आरोग्यप्रमुखांना सहायक आरोग्यप्रमुखांनी या कामात मदत करणे अपेक्षित आहे. या द्विसदस्यीय समितीची महिन्यातून एक तरी बैठक होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांत एकही बैठक झालेली नाही.
कारवाईचा अजेंडा ठरविणे, त्याची कार्यपत्रिका, केलेल्या कारवायांची माहिती आदींविषयी या बैठकीमध्ये साधकबाधक चर्चा होते. महापालिका आयुक्तांनी लोकशाही दिन झाल्यानंतर यासंदर्भात बैठक घेण्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, आयुक्तांच्या सूचनांनाही वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. नवीन कारवाया करणे, त्याचे नियोजन, तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई करणे, न्यायालयातील प्रलंबित खटले, झालेल्या शिक्षा यांविषयी सूचना आणि चर्चा या समितीकडून अपेक्षित आहेत. बोगस डॉक्टरांवर अंकुश ठेवणे आणि त्यांची प्रॅक्टिस थांबविण्याचे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागापुढे आहे.
आम्ही आरोग्य विभागामध्ये पीसीपीएनडीटी आणि बोगस डॉक्टरसह विविध विषयांना स्वतंत्र अधिकारी नेमलेले आहेत. मी सूत्रे स्वीकारल्यानंतर बैठक झाली नसली तरी यापूर्वी झालेल्या बैठकांचे अहवाल मागविले आहेत. आजवर किती कारवाया झाल्या, न्यायालयातील प्रलंबित खटले, किती जणांना शिक्षा झाल्या याची माहिती मागविण्यात आली आहे. यासोबतच पालिकेच्या धडक मोहिमा सुरू आहेत. धाडी टाकण्याचे आणि तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे कामही सुरू आहे. अहवाल मिळाल्यानंतर समिती अध्यक्ष असलेल्या आयुक्तांसमवेत बैठक घेण्यात येईल.
- डॉ. रामचंद्र हंकारे,
आरोग्यप्रमुख, पुणे महानगरपालिका