लायगुडे रुग्णालयात आता ५० ऑक्सिजन बेडची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:27+5:302021-05-09T04:10:27+5:30
वडगांव खुर्द येथील महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयात सर्व सुविधा असूनही केवळ स्टाफ नसल्याने २० ऑक्सिजन बेड धूळ खात ...
वडगांव खुर्द येथील महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयात सर्व सुविधा असूनही केवळ स्टाफ नसल्याने २० ऑक्सिजन बेड धूळ खात पडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. लायगुडेमधील ऑक्सिजन जनरेटिंग प्लान्ट कार्यान्वित करून लोकार्पणसाठी महापौर मुरलीधर मोहोळ आले होते. मनुष्यबळाच्या अडचणीमुळे २० ऑक्सिजन बेड वापराविना पडून असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर, त्यांनी तत्काळ महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. यावेळी आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, नगरसेविका राजश्री नवले, मंजूषा नागपुरे, भाजपा उपाध्यक्ष अरुण राजवाडे, बाळासाहेब नवले आदी उपस्थित होते.
कोट:
मनुष्यबळ लवकर उपलब्ध करून दिले असते, तर आत्तापर्यंत कित्येक रुग्णांचे प्राण वाचले असते. एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, तर दुसरीकडे महापालिकेच्या रुग्णालयात सुविधा असतानाही केवळ मनुष्यबळ नसल्याने २० ऑक्सिजन बेड वापराविना पडून होते, हे दुर्दैव आहे.
- महेश पोकळे, शिवसेना विभागप्रमुख, खडकवासला मतदारसंघ
महापालिकेकडून तत्काळ काही प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, येत्या दोन दिवसांत अजून काही डॉक्टर्स, नर्स जॉईन होणार आहेत. त्यामुळे उर्वरित ऑक्सिजन बेड तत्काळ सुरू करण्यात येणार आहेत.
- डॉ. अक्षय सनातन, वैद्यकीय अधिकारी, लायगुडे रुग्णालय
वडगाव - धायरी भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने लायगुडे रुग्णालयातील २० ऑक्सिजन बेड तत्काळ सुरू करण्यात यावेत, यासाठी महापालिका प्रशासनाकडे तसेच महापौरांकडे सातत्याने पाठपुरावा केला.
- राजाभाऊ लायगुडे, स्थानिक नगरसेवक
फोटो ओळ: महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लायगुडे रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.