लाेन ॲप गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार; सहसचिवांचे डीजीपी, पाेलीस आयुक्तांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 09:39 AM2022-10-31T09:39:15+5:302022-10-31T09:40:57+5:30
कमी उत्पन्न असलेला वर्ग यामध्ये भरडला जात आहे....
पुणे : बेकायदा लाेन ॲपच्या माध्यमातून कर्ज देत, त्यावर अवाजवी कर्जवसुली केल्याप्रकरणी देशभरात माेठ्या संख्येने तक्रारी दाखल झाल्या आहेत. कमी उत्पन्न असलेला वर्ग यामध्ये भरडला जात आहे. या गुन्ह्यांचा भारताची अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर त्याचा परिणाम हाेत आहे. त्यामुळे लाेन ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि या संदर्भात नागरिकांत जनजागृती करावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव अशिष कुमार यांनी राज्यांना दिले आहेत.
सायबर गुन्हेगार लाेन ॲपच्या माध्यमातून कर्ज दिल्यानंतर अवाजवी कर्ज वसुली करतात. यासाेबतच कर्जदाराच्या माेबाइलमधील काॅन्टॅक्टस, लाेकेशन आणि फाेटाे आणि व्हिडीओज अशी वैयक्तिक माहिती चाेरतात. त्याद्वारे फाेटाे माॅर्फ करून ब्लॅकमेल आणि त्रास देण्यासाठी उपयाेग करण्यात आला आहे. कर्जवसुलीच्या तगादा लावल्यामुळे, तसेच एजंटच्या जाचास कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. या गुन्हेगारांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेसमाेर आव्हान उभा केले आहे. अर्थव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवरही त्याचा परिणाम हाेत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
नागरिकांना कर्ज देणाऱ्या या लाेन ॲपवर काेणतेही नियंत्रण नाही, तसेच ते आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. सायबर गुन्हेगार डिस्पाेजल इमेल, व्हर्च्युअल नंबर, खाते आदीच्या माध्यमातून संघटीतरीत्या हे गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
भारताच्या गृहमंत्रालयातील सहसचिव अशिष कुमार यांनी या संदर्भात सर्व राज्य, तसेच केंद्रशासित प्रदेशातील सचिव, पाेलीस महासंचालक आणि विविध शहरांतील पाेलीस आयुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि सीबीआयच्या संचालकांना पत्र पाठवून, या संदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत, तसेच लाेन ॲप चालविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे आणि या लाेन ॲपचा वापर करू नये, यासाठी नागरिकांत जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.
लाेन ॲपद्वारे फसवणूक कशी टाळता येईल?
- क्रेडिट स्काेरला महत्त्व देण्याऐवजी स्वत:ची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती तपासा.
- कर्जपुरवठा करणारी संस्था शासकीय नाेंदणीकृत आहे का, याची तपासणी करा.
- कर्जपुरवठा करणाऱ्याचा प्रत्यक्षात पत्ता, संपर्क क्रमांक नसेल, तर कर्ज घेऊ नका.
- प्रक्रिया शुल्क आणि जीएसटी यासाठी कर्जमंजुरीपूर्वी रक्कम जमा करणे टाळा.
- मर्यादित काळासाठी ऑफर असल्याचे सांगत तुम्हाला निर्णय घ्यायला लावतात.