एक लाखाचे चक्रवाढीने आठ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 01:49 AM2018-12-15T01:49:37+5:302018-12-15T01:49:57+5:30
खासगी सावकारीचे असेही व्याज; महिलेला धमकी
पुणे : व्याजाने घेतलेल्या १ लाख रुपयांचे चक्रवाढ व्याजदराने एकूण ८ लाख २४ हजार रुपये परत न केल्याने एका महिलेला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांचे मंगळसूत्र काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने अलंकार पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दोघांना अटक केली आहे. रेश्मा प्रशांत खामकर (वय २८, रा. शेलारवाडा, बिबवेवाडी) आणि उमेश सुरेश खिरीड (वय ३३, रा. आईमाता मंदिरामागे, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये आरोपींकडून १ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी वेळोवेळी १ लाख ७३ हजार ९०० रुपये परत केले. मात्र खामकर १० टक्केप्रमाणे दरमहा १० हजार रुपये मागत होती. तिने फिर्यादी यांचे बँक आॅफ बडोदाचे पासबुक व चेकबुक घेतले. त्यावर जबरदस्तीने चार कोऱ्या चेकवर फिर्यादीच्या सह्या घेतल्या होत्या.
तसेच बँक आॅफ बडोदाच्या पैसे काढण्याच्या कोºया स्लिपवरदेखील फिर्यादीच्या सह्या घेतल्या. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले. तसेच आणखी ७ लाख रुपये देण्याची मागणी करीत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. बुवा तपास करीत आहेत.