पडद्यामागील कलाकारांना ‘लाख’मोलाची मदत
By admin | Published: June 29, 2017 03:38 AM2017-06-29T03:38:08+5:302017-06-29T03:38:08+5:30
कलावंतांना अभिनयातून प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. कलाकृतीसाठी झटणारे पडद्यामागील कलाकार मात्र कायम दुर्लक्षित राहतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कलावंतांना अभिनयातून प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. कलाकृतीसाठी झटणारे पडद्यामागील कलाकार मात्र कायम दुर्लक्षित राहतात. त्यांच्या आरोग्याची समस्या उभी राहिल्यास आर्थिक चणचण जाणवते. ही समस्या दूर करण्यासाठी जिव्हाळा फाउंडेशनने संकलित केलेला पावणेआठ लाख रुपयांचा निधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे बुधवारी सुपूर्द करण्यात आला. या निधीतून पडद्यामागच्या कलाकारांना, तंत्रज्ञांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा जिव्हाळा फाउंडेशनच्या विश्वस्त अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित महोत्सवात अभिनेत्री अलका कुबल यांनी या निधीची घोषणा केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
कुबल म्हणाल्या, कलाकारांनी एकत्र येऊन काही वर्षांपूर्वी जिव्हाळा ट्रस्टची स्थापना केली होती. हे काम नीटपणे व्हावे, यासाठी हा निधी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.