तीन घरफोड्यांत ४२ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 03:14 AM2018-02-02T03:14:41+5:302018-02-02T03:14:55+5:30
शहरातील घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेतले जात नसून, दररोज किमान तीन घरफोड्यांचे प्रकार घडताना दिसून येत आहे़ बुधवारी चोरट्यांनी विश्रांतवाडी, धायरी आणि पिंपळे निलख या परिसरात केलेल्या घरफोड्यांमध्ये तब्बल ४२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
पुणे : शहरातील घरफोड्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेतले जात नसून, दररोज किमान तीन घरफोड्यांचे प्रकार घडताना दिसून येत आहे़ बुधवारी चोरट्यांनी विश्रांतवाडी, धायरी आणि पिंपळे निलख या परिसरात केलेल्या घरफोड्यांमध्ये तब्बल ४२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत़
प्रशांत तांबे (वय ३८, रा़ सुभाषनगर, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत तांबे यांची पिरंगुट येथे स्वत:ची कंपनी आहे. त्यांच्या पत्नी एका आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ते सुभाषनगर येथील प्रणयराज हेरिटेज सोसायटीत भाड्याने राहतात. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या पत्नी कामाला बाहेर पडल्या, तर तांबे हे त्यांच्या कामासाठी साडेनऊच्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता त्यांच्या पत्नी घरी परतल्या. त्या वेळी त्यांना दाराला फक्त कडी लावलेली दिसली. त्यांनी आत पाहिल्यावर कपाटातील ११ लाख ८८ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी हा प्रकार तांबे यांना फोन करून सांगितला. तांबे यांनी तत्काळ विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे पुढील तपास करीत आहेत.
तेजस मार्कंडेय मिठापेल्ली (वय ३१, रा़ लिमयेनगर, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिठापेल्ली कुटुंबीयाचा रविवारपेठेत साडीविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा धायरी येथील लिमये नगरमध्ये रो-हाऊस आहे. मिठापेल्ली यांचे वडील फिरण्यासाठी ३० जानेवारीला गुजरात येथे गेले होते. त्यांची बहीण नोकरीनिमित्त बाहेर गेली होती. तेजस हे रविवार पेठेतील त्यांच्या साडीदुकानात गेले होते. दुकानातून संध्याकाळी घरी आले असता त्यांच्या रो-हाऊसच्या किचनच्या खिडकीचा गज कापून चोरट्यांनी ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याचे समोर आले.
पिंपळे निलख येथील करिपाल बंगला बंद असताना चोरट्यांनी किचन-रूमच्या मागील लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतील लाकडी दरवाजा तोडून प्रवेश केला़ बेडरूममधील तीन लोखंडी कपाटातील ३५ हजार रुपये व सोन्याचे दागिने, असा २४ लाख ३४ हजार १६५ रुपयांचा ऐवज चोरुन नेला़