विविध रंगाची लाखाे फुले एकाच छताखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 06:09 PM2020-01-17T18:09:32+5:302020-01-17T18:16:08+5:30
पुण्यातील एम्प्रेस गार्डन येथे विविध फुलांचे प्रदर्शन भरले असून लाखाे फुले एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
पुणे : विविध रंगाची, जातीची लाखाे फुले एकाच ठिकाणी बघण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्पाेत्सव सुरु करण्यात आला असून यात निरनिराळ्या प्रकारची लाखाे फुले मांडण्यात आली आहेत. ही फुले पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी हाेत आहे.
गेल्या 23 वर्षांपासून एम्प्रेस गार्डन येथे हे फुलांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. पुष्पप्रदर्शनात केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शाेभिवंत झाडांच्या कुंड्याची आकर्षक मांडणी, मनमाेहक फुलांची मांडणी, पाने - फुले वापरुन तयार केलेल्या विविध पुष्प रचना, तसेच विविध प्रकारचे प्रदर्शनीय स्टाॅल्स आदी गाेष्टींचा यामध्ये समावेश आहे. तसेच प्रदर्शन पाहण्यास आलेल्या नागरिकांना फुलांची राेपे, कुंड्या तसेच बागकामासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करता येणार आहेत.या प्रदर्शनामुळे संपूर्ण परिसर फुलांनी बहरुन गेला आहे. राज्यातून विविध नागरिक हे प्रदर्शन पाहण्यासाठी येत आहेत.
प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या स्मिता जाेशी म्हणाल्या, आम्ही हैद्राबादहून हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलाे आहाेत. खूप आनंददायी वातावरण इथे आहे. विविध प्रकारची फुले इथे पाहायला मिळाली. वेगवेगळ्या प्रांतांमधील फुले सुद्धा येथे आहेत. मुलांनाही येथे आल्यानंतर छान वाटले. पुढच्या वर्षी देखील हे प्रदर्शऩ पाहण्यासाठी येण्याचा आमचा विचार आहे.
विशाल शहा म्हणाले, साेलापूरहून हे प्रदर्शन पाहण्यासाठी आम्ही आलाे. हे प्रदर्शन पाहून मन तृप्त झालं आहे. मागील वर्षीच इथे येण्याचा आमचा विचार हाेता. उत्तम पद्धतीने फुलांची मांडणी येथे केली आहे. फुले पाहून डाेळ्याचे पारणे फिटतात. बाहेरील देशातील प्रदर्शन पाहण्यासाठी जाण्यापेक्षा भारतातील ही प्रदर्शने पाहण्यासाठी लाेकांनी यायला हवे.