श्री शंकर महाराज समाधीस्थळी लोटला लाखो भक्तांचा जनसागर; पुण्यात प्रकटदिन सोहळा उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 04:12 PM2022-11-01T16:12:13+5:302022-11-01T16:12:22+5:30
श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
धनकवडी: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या धनकवडी येथील श्री शंकर महाराज समाधी स्थळी प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने लाखो भक्तांचा जनसागर लोटला होता. पहाटे चार वाजल्यापासून भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
प्रकट दिनानिमित्त श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कीर्तन महोत्सव, श्री. शंकर महाराजांची चरित्र भावकथा व भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिरात विक्रमी पाच हजार बँगा रक्त संचलनाचे उदिष्ट आयोजकांनी निर्धारित केले असून मोठ्या प्रमाणात रक्तदाते रक्तदान शिबिरासाठी उपस्थित होते.
प्रकटदिनाचे औचित्य साधून होणारी गर्दी पाहता समाधी मठाच्या वतीने संपूर्ण परिसरात उत्तम व सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. भक्तांना रांगेत दर्शन घेता येईल या संदर्भात विशेष काळजी घेण्यात आली आहे. भाविक भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र वाईकर व सचिव सतीश कोकाटे यांनी दिली. याप्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त निलेश मालपाणी,राजा सूर्यवंशी, प्रताप भोसले उपस्थित होते. पुणे शहरासह, जिल्हा व महाराष्ट्र भरातून भाविक भक्तांनी प्रकट दिनाचे औचित्य साधून दर्शनाला उपस्थिती लावली होती. या निमित्ताने स्वामींच्या मुर्ती सह फुलांची केलेली आकर्षक आरास भक्तांचे लक्ष वेधून घेत होती.
भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी धनकवडी भागात समाधी घेतली. सदगुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या-त्या भागात दर्शन दिले तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी श्री शंकर महाराज यांचा प्रकटदिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होतो. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर असून, हे स्थान लाखो भक्तांचे श्रध्दास्थान आहे.