तुकाराम बीजला लाखो भाविकांचे इंद्रायणीत स्नान होणार; नदी सांडपाण्याने दूषित, आजारांचा धोका
By श्रीकिशन काळे | Published: March 14, 2024 03:16 PM2024-03-14T15:16:43+5:302024-03-14T15:17:28+5:30
येत्या २७ मार्चला तुकाराम बीज असल्याने लाखो भाविक इंद्रायणीकाठी येतात, स्नानही करतात, परंतु सांडपाणी सोडल्याने इंद्रायणी दूषित झाली आहे
पुणे : प्रदूषित पाण्यामुळे देहू येथील इंद्रायणीनदीतील महाशीर माशांचा जीव गेला. त्यावर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील याची दखल घेतली आहे. घटनास्थळीची पाहणी करून ‘सीईओ’ला नोटीस बजावणार असल्याचा पवित्रा मंडळाने घेतला आहे. माशांचा मृत्यू कशामुळे झाला, त्याची माहिती अधिकारी घेत आहेत. तसेच पाण्याचे नमुनेही घेतले आहेत.
इंद्रायणीनदीमध्ये भाविक येऊन अंघोळ करत असता. तसेच या नदीतील महाशीर माशांना इतिहास आहे. ते येथील स्थानिक मासे असून, त्यांचा उल्लेख संत तुकाराम महाराज यांच्या काळापासून आहे. विठ्ठलाच्या कानाशी या माशांचा संबंध आहे. त्यामुळे या माशांना एक वेगळे महत्त्व आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुकाराम बीज असल्याने लाखोच्या संख्येने भावीक इंद्रायणीकाठी येत असतात. त्यामुळे नदीचे पाणी जर प्रदूषित असेल तर या भाविकांना विविध आजार होण्याचा धोका देखील आहे. त्यामुळे यावर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
देहू आणि परिसरातील सांडपाणी थेट नदीत जात असल्याने हे मासे मरत आहेत. या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. ते स्थानिक प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे काम आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या विषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे म्हणाले, आम्ही इंद्रायणीच्या काठी कर्मचारी पाठवले आहेत. ते तेथील पाहणी करून पाण्याचे नमुने घेत आहेत. मासे कशामुळे मेले त्याची चौकशी होईल. गावातील सांडपाणी थेट नदीत जात आहे. तिकडे कारखाने नाहीत. त्यामुळे या सांडपाण्यामुळे मासे मृत झाले. जिल्हा परिषदेचे सीईओ यांना आम्ही याबाबत नोटीस बजावणार आहोत.’’
विठ्ठलाच्या कानात महाशीर !
महाशीर हा मासा सिप्रिनिडाई (Cyprinidae) कुळातील आहे. हा मासा संकटग्रस्त यादीत आहे. मध्य प्रदेश सरकारने तर या माशाला राज्य माशाचा दर्जा दिला आहे. नर्मदा नदीत देखील हा मासा आढळतो. महाशीर मासा श्रृंगारासारखा वापरला जातो. विठ्ठलाच्या कानात हेच मासे आपल्याला पहायला मिळतात.