Pune Dahi Handi 2024: आला रे आला गोविंदा आला! पुण्याच्या दहीहंडी उत्सवात लाखाेंची बक्षिसे अन् काेटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 01:42 PM2024-08-27T13:42:12+5:302024-08-27T13:42:30+5:30
पुण्यात आकर्षक दहीहंडी, ती फाेडण्यासाठी सज्ज झालेला गाेविंदा पथक, त्यावर लावलेली लाखो रुपयांची बक्षिसे...तारे-तारकांची उपस्थिती आणि गाण्यांचा जलवा
पुणे: दहीहंडी म्हणजे श्रीकृष्ण जन्माचा उत्सव. मागील काही वर्षांत या उत्सवाचा एक ‘इव्हेंट’च झाला आहे. दोन्ही बाजूंना दोरी बांधून अडकवलेली हंडी इतिहासजमा झाली असून, आता क्रेनचा वापर सर्रास हाेत आहे. आकर्षक दहीहंडी, ती फाेडण्यासाठी सज्ज झालेला गाेविंदा पथक, त्यावर लावलेली लाखो रुपयांची बक्षिसे...तारे-तारकांची उपस्थिती आणि गाण्यांचा जलवा.. पुण्यात पाहायला मिळणार आहे. याच्या पूर्वसंध्येलाच संपूर्ण तयारी करण्यात आली हाेती. दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्माचे स्वागत करण्यासाठीच्या जय्यत तयारीने पुण्यात ‘गाेकुळ’ अवतरले आहे. (Pune Dahi Handi 2024)
पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा हाेत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अधिकच भर पडली आहे. यात लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून, अनेक तारे-तारकांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यंदा डीजे, लेसरवर बंदी घालण्यात आल्याने दणदणाट मात्र काहीसा कमी हाेणार आहे.
अधिकृत, अनधिकृत अशी मिळून जिल्ह्यात हजारभर सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. यात मंडळांनी गाेविंदांसाठी ११ हजार १११ पासून ते १ लाख १ हजार १११ रुपयांपर्यंतची बक्षिसे जाहीर केली आहेत. शहराच्या मध्यभागातील अखिल मंडई मंडळ, सुवर्णयुग तरुण मंडळ, बाबू गेनू मंडळ याबरोबरच आता ठिकठिकाणची लहानमोठी मंडळेदेखील स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या साह्याने दहीहंडी साजरी करू लागली आहेत. शहराच्या उपनगरांमध्येदेखील दहीहंडीचा उत्सव माेठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे.
निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी असे सण-उत्सव म्हणजे नागरिकांसमोर झळकण्याची एक संधी. त्यामुळे त्यांचा थाटच न्यारा. खर्चही न्यारा. उपनगरातील एका मंडळाने दहीहंडी फोडणाऱ्या मंडळासाठी १ लाख १ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शहराच्या मध्यभागापेक्षाही उपनगरांत दहीहंडीचा जोर जास्त दिसतो आहे. तालुक्यांमधील मुख्यालयांमध्ये हीच स्थिती आहे. तिथेही राजकीय पदाधिकाऱ्यांनी व पदाधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांनी समर्थक कार्यकर्त्यांच्या साह्याने जोरदार वातावरण निर्मिती केली आहे.
उत्साहाला उधाण
गेले सलग काही दिवस बरसणाऱ्या पावसानेही गोविंदांच्या उत्साहात भर टाकली आहे. मंगळवारी सायंकाळी एकावर एक असे थर लावून हंडी फोडतानाही पावसाची अशीच बरसात असावी, हीच गोविंदांची इच्छा आहे. शहरातील सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते सोमवारपासूनच दहीहंडीच्या नियोजनात मग्न आहेत. मागील काही वर्षांत दोरीला हंडी लावून ती फोडण्याची प्रथा बंद पडली आहे. आता क्रेन बोलावली जाते. तिच्या टोकाला हंडी बांधली जाते. ती फुलांनी विद्युत रोषणाईने सजवली जाते. फुलांच्या माळा लावल्या जातात. फुगे, नोटा यांच्या साह्याने दूरवरून दिसेल, अशा आकर्षक पद्धतीने हंडी सजवली जाते.
फ्लेक्सची धुळवड
चार दिवस आधीपासूनच शहरातील चौकाचौकांमध्ये दहीहंडी उत्सवाचे फ्लेक्स लागले आहेत. त्यावर श्रीकृष्णाच्या आकर्षक छबीबरोबरच संयोजकांचे चेहरे देखील नावांसह झळकत आहेत. या भल्या मोठ्या फ्लेक्सच्या विरोधात कितीही बोलले जात असले, त्यानंतर त्यांच्यावर थोडीफार कारवाई होत असली तरीही फ्लेक्स लागण्याचे काही थांबत नाही. दहीहंडीचाही त्याला अपवाद नाही. मोक्याचे ठिकाण शोधून तिथे दहीहंडीचे भले मोठे फ्लेक्स दिसत आहेत. काही चौक तर फ्लेक्सचेच झाले आहेत. या फ्लेक्सना काही ठिकाणी विद्युत रोषणाईही केली आहे.
पडद्यावरच्या तारे-तारकांची हजेरी
चित्रपट, दूरचित्रवाहिन्यांवरील कलाकारांची उपस्थिती हेही मागील काही वर्षे दहीहंडीचे आकर्षक झाले आहे. मंडळांकडून लाखो रुपये या तारे-तारकांना मोजले जातात. दहीहंडीच्या स्टेजवर बोलण्याचे, कला सादर करण्याचे वेगळे पैसे आकारले जातात. यंदाही अनेक तारे-तारका वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत. त्यात आता रील स्टार्सची भर पडली आहे. स्मिता गोंदकरपासून ते रील स्टार मयुरी गोंदकरपर्यंत अनेक तारका मंगळवारी वेगवेगळ्या दहीहंडीला उपस्थित असतील.