भीमाशंकर येथे श्रावण सरी, दाट धुके आणि हर हर महादेवच्या गजरात घेतले लाखो भाविकांनी दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 04:49 PM2018-08-13T16:49:36+5:302018-08-13T16:52:17+5:30
सोमवारी भीमाशंकरमध्ये दाट धुके पसरले होते. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या, अशा वातावरणात भाविकांनी दर्शन घेतले.
घोडेगाव : ‘ओम नम:शिवाय, ओम नम:शिवाय- हर हर बोले नम:शिवाय...’च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे एक लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून गर्दी दिसत आहे.
सोमवारी भीमाशंकरमध्ये दाट धुके पसरले होते, तर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. अशा वातावरणात भाविक दर्शनरांगेत उभे राहून दर्शन घेत होते. रविवारी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, सोमवारी रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी झाल्याचे दिसले नाही. भीमाशंकरमधील हॉटेल, पेढे व प्रसादाच्या दुकानांवर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. दरवर्षीप्रमाणे आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाचे स्वयंसेवक मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम करत होते.
देवस्थानाचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त अर्चना यादव, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, आंबेगावचे तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार हे मंदिर, पायऱ्या, वाहनतळ, बस स्थानक येथे सतत फिरून यात्रेचे नियोजन व येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम करत होते.
.....................
भीमाशंकर येथे श्रावणी सोमवार यात्रेसाठी देवस्थानाने पूर्ण तयारी केली असून गाभाऱ्यातील ज्योतिर्लिंगाचे दर्शन लवकर व्हावे यासाठी अभिषेक बंद ठेवण्यात आले आहेत. श्रावणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी वाहतूक कोंडी झाली. एसटी महामंडळाच्या मिनीबस न मिळाल्याने दोन मोठ्या गाड्या छोट्या रस्त्याने पास होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली. सोमवारी पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे वाहतूककोंडी झाली नाही. देवस्थानाने खासगी मिनीबस ठेवण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी दुपारपासून या मिनीबस सुरू झाल्या आहेत. तसेच, ऐन वेळी गरज पडल्यास स्थानिक छोट्या गाड्यांना पोलिसांनी परवानगी द्यावी, अशी माहिती भीमाशंकर देवस्थानाचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी दिली.
....................
भीमाशंकरकडे येणाऱ्या वाहनांसाठी ४ किलोमीटर अलीकडे निगडाळे गावाजवळ वाहनतळ करून तेथेच सर्व वाहने थांबवली आहेत. येथून एसटी महामंडळाच्या बसने सर्व भाविक भीमाशंकरपर्यंत जात आहेत. या नियोजनामुळे कुठेही वाहतूककोंडी झाली नाही. तसेच भीमाशंकर यात्रेसाठी वाहनतळापासून मंदिरापर्यंत चोख बंदोबस्त नेमण्यात आला आहे; त्यामुळे दर्शन व्यवस्थित व लवकर होत आहे. असेच नियोजन पूर्ण श्रावण महिनाभर असेल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी सांगितले.
.....................................