परवाने शंभर, दुकाने हजारांवर
By admin | Published: October 25, 2016 06:27 AM2016-10-25T06:27:00+5:302016-10-25T06:27:00+5:30
उद्योगनगरीत आठवडाभरापासून ठिकठिकाणी भूछत्राप्रमाणे फटाक्यांचे बेकायदा स्टॉल लागले आहेत. अग्निशामक विभागातर्फे फक्त ९२ विक्रेत्यांनाच परवानगी दिली
पिंपरी : उद्योगनगरीत आठवडाभरापासून ठिकठिकाणी भूछत्राप्रमाणे फटाक्यांचे बेकायदा स्टॉल लागले आहेत. अग्निशामक विभागातर्फे फक्त ९२ विक्रेत्यांनाच परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले असताना प्रत्यक्षात हजारांच्या वर दुकाने थाटली असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून दिसून आले. विशेष म्हणजे या विक्रेत्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे दुर्घटना उद्भवल्यास त्याचा फटका जवळच्या लोकवस्तीला होऊ शकतो.
अग्निशामक आणि पोलिसांचा परवाना मिळाल्यावरच फटाके विक्री करण्याचे दुकान थाटता येते. ना हरकत दाखला देताना अग्निशामक विभागातर्फे संबंधित व्यक्तीचे दुकान सुरक्षित ठिकाणी आहे का, याची तपासणी करूनच परवाने दिले जात आहेत. दुकान हे आरसीसी बांधकाम आणि शटर असलेले असावे, पक्के बांधकामचे दुकान नसेल तर मोकळ्या जागेत पत्र्यांच्या शेडमध्ये दुकान उभारावे, दुकानामध्ये आग विझविण्याचे उपकरण बसवावे, तसेच किराणा, इलेक्ट्रिक साहित्य, कपडे आणि स्फोटक रसायने असलेल्या दुकानांच्या शेजारी स्टॉल उभारू नये, अशा सूचनादेखील अग्निशामक विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षातील शहरातील ठिकाणी व गल्लीबोळातील फटाके विक्रत्यांनी नियमांचे पालन न करता विना परवाना स्टॉल उभारले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी झोपडपट्टीचा परिसरदेखील आहे. (प्रतिनिधी)
चायनीय फ टाक्यांच्या मागणीत घट
- गेल्या काही वर्षांपासून चिनी उत्पादकांनी भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण केले होते़ मात्र, सोशल मीडिया आणि तरुणांच्या आवाहनानंतर राज्यतील बहुतांश शहरांमध्ये चिनी वस्तूंवर नागरिकांनी बहिष्कार घातला असल्याचे चित्र दिसून येत आहे़ दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही बाजारपेठेत चिनी फ टाक्यांना मागणी नसल्याचे दुकानदारांनी सांगितले़ विविध आर्कषक रंगातील कमी आवाजाचे फ टाके, रोषणाई करणारे फुलबाजे, छोटे अॅटमबॉम्ब यावर वर्चस्व निर्माण करणारी चिनी बाजारपेठ यंदा मात्र भारतीय बनावटीच्या फ टाक्यापुढे तग धरत नसल्याचे आढळून येत आहे़ मागणी अत्यल्प असल्यामुळे आणि
तरुणांच्या बहिष्कारामुळे अनेक दुकानदारांनी चिनी मालाची खरेदी केली नसल्याचे सांगितले़
अग्निशामक विभागातर्फे फटाके विक्रीचे दुकान थाटण्यासाठी आतापर्यंत ९२ नागरिकांना ना हरकतीचे दाखले दिले आहेत. ना हरकत दाखला मिळाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला फटाक्यांचे दुकान लावण्याचा अधिकार नाही आणि शहरात ९२च्या वर जादा दुकाने आहेत. त्या बेकायदा दुकानांवर कारवाईचा अधिकार पोलिसांना आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पिंपरी व चिखली या ठिकाणी अग्निशामक विभागाचे वाहने २४ तास हजर राहणार आहेत.
- किरण गावडे, अग्निशामक अधिकारी, पिंपरी
शहरातील कोणत्याही नागरिकांनी बेकायदा स्टॉल उभारू नये. परवाना घेऊनच स्टॉल उभारणे आवश्यक आहे. बेकायदा स्टॉलवर पोलिसांतर्फे कारवाई केली जाणार आहे.
- राम मांडुरके, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग