लोन अँपद्वारे लाखोंचा गंडा; देशविदेशात टोळ्या सक्रिय, 1 लाखांपेक्षा अधिक खाती गोठवली
By नम्रता फडणीस | Published: September 30, 2022 06:27 PM2022-09-30T18:27:59+5:302022-09-30T18:28:16+5:30
एक लाखापेक्षा अधिक बँक खाती गोठविण्यात आली असून याद्वारे एकूण 69 लाख 27 हजार 59 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वाचविण्यात पोलिसांना यश आले
पुणे : झटपट लोन मिळण्यासाठी ऑनलाईन लोन अँप्लिकेशनची लिंक डाऊनलोड करताय, तर सावधान! या अँपद्वारे लोकांना लाखो रूपयांचा गंडा घातला जात आहे. याकरिता देशविदेशात लोन अँप कंपनीची कॉल सेंटर सुरू असून, वेगवेगळ्या राज्यांमध्ये या कामासाठी लोन अँपना सिमकार्ड पुरविणारी, लोन अँप बनविणारी, बँक अकाऊंट पुरविणारी, कॉल सेंटरचे काम करणारी, पैशांचा व्यवहार हाताळणारी या माध्यमातून वेगवेगळे काम करणा-या टोळ्या कार्यरत आहेत. लोन अँप फ्रॉड करणा-या कंपन्यांनी वापरलेल्या अकाऊंटची माहिती काढून बँकांशी तत्काळ संपर्क करुन एक लाखापेक्षा अधिक बँक खाती गोठविण्यात आली आहेत. याद्वारे एकूण 69 लाख 27 हजार 59 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे.
लोन अँपच्या फसवणूक प्रकरणातील ही सर्वात मोठी कारवाई असून, आत्तापर्यंत पोलिसांनी बँगलोरच्या कॉल सेंटरमधून 11 आणि खराडी पुणे, जळगाव, सोलापूरमधून 7 आरोपींना अटक केली आहे. फसवणुकीचे धागेदोरे परदेशातही असल्याचे समोर आले आहे. कॉल सेंटर व आरोपींच्या ताब्यातून 10 सिमकार्ड, हजेरी रजिस्टर, ओळखपत्र, लेटरहेड, नोंद वही, डिव्हीडी, 15 संगणक, 3 राऊटर, 50 इनव्हाईस फाईल्स, 10 मोबाइल फोन, हेडफोन आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दुबईत वास्तव्यास असणारे चिनी चोरटे याचे मुख्य सूत्रधार असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले .
कॉल सेंटरचे काम करणारे आरोपी हे लोन अँपचे कर्ज घेतलेल्या लोकांना कॉल करून अश्लील भाषा वापरून, शिवीगाळ करून तसेच धमकी देण्याचे मेसेजेस व कॉल करण्याचे काम करीत होते. त्यांच्याकडे लोन अँप कंपनी मार्फत लोन अँपचे कर्ज घेतलेल्या हजारो लोकांचा खाजगी डेटा हा त्यांच्याकडील डिव्हाईस व कागदपत्रांमध्ये मिळून आला आहे. कॉल सेंटरवर 16 पेक्षा जास्त लोन अँप्लिकेशनचे कामकाज चालत होते. त्यांचा सर्व डेटा मिळून आला आहे. दरम्यान, मजुरांना फसवून त्यांच्या कागदपत्रांच्या गैरवापर इंटरनेट बँकिंग सुविधा असलेली बँक खाती उघडण्यात आली होती. गेल्या तीन वर्षात लोनॲपच्या माध्यमातून फसवणूक केल्या प्रकरणी पुणे शहर आणि जिल्ह्यातून चार हजार ७७४ तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.