लाखोे वारकर्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल; अलंकापुरी न्हाऊन निघाली भक्तीरसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:55 PM2017-11-13T13:55:34+5:302017-11-13T14:01:27+5:30
संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या ७२२ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा भरला आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून विविध ठिकाणांहून पायीवारी करीत येत असलेल्या असंख्य भाविकांच्या दिंड्या आळंदीत स्थिरावत आहेत.
आळंदी : आळंदीची वारी आहे माझे घरी!
आणिक न करि तीर्थव्रत !!
या ओवीप्रमाणे ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ श्री ज्ञानोबारायांच्या ७२२ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा भरला आहे. राज्याच्या कानाकोपर्यातून विविध ठिकाणांहून पायीवारी करीत येत असलेल्या असंख्य भाविकांच्या दिंड्या; तसेच पालख्या प्रदक्षिणा पूर्ण करून आळंदीत स्थिरावत आहेत. त्यानंतर भाविक दर्शन रांगेतून अगदी सुलभ पद्धतीने ‘श्रीं’च्या समाधीचे दर्शन घेत आहेत. सुरक्षा यंत्रातूनच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधीचा हा आनंददायी सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकरी दिंडी, पालखीसह टाळ-मृदंगांच्या गजरात ‘ज्ञानोबा -माऊलीं’चा जयघोष करीत अलंकापुरीत मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे पवित्र इंद्रायणीकाठ भाविकांनी गजबजून निघाला आहे.
भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आदी कार्यक्रमांमध्ये वारकरी व भाविक दंग होऊन संजीवन सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. आज (दि.१२) दिवसभरात वडगाव रोड, मरकळ रोड, चाकण रोड, भोसरी मार्ग आदी ठिकाणांहून वारकर्यांच्या पायी दिंड्यांनी अलंकापुरीत प्रवेश केला. आळंदीत दाखल झाल्यानंतर ‘पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ असा जयघोष प्रत्येक वारकर्यांकडून केला जात आहे. मंगळवारी (दि.१४) कार्तिकी एकादशी असल्याने एकादशीची संपूर्ण जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, आळंदीत टाळ-मृदंगांचा गजर सुरू आहे. पवित्र इंद्रायणीतीरी व मंदिराच्या वीणामंडपात महिला वारकरी फेर, फुगड्या, भारूडे सादर करून आनंद घेत होते. देहभान विसरून वारकरी सोहळ्याचा अनुभव घेत आहेत. अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.