Pune Municipal Corporation: लक्ष्मी रस्ता शनिवारी दुपारी वाहतुकीस बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 11:05 AM2021-12-10T11:05:22+5:302021-12-10T11:05:29+5:30
लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या मारुती चौक हा मार्ग सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत वाहतुकीसाठी तसेच पार्किंगसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
पुणे : महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. ११) आयोजिलेल्या पादचारी दिनानिमित्त, ‘लक्ष्मी रोड ओपन स्ट्रीट मॉल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे यादिवशी लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या मारुती चौक हा मार्ग सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत वाहतुकीसाठी तसेच पार्किंगसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
महापालिकेच्या पथ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पादचाऱ्यांची सुरक्षितता व त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ११ डिसेबर हा पादचारी दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवशी नागरिकांनी शक्यतो खासगी वाहनांचा वापर टाळावा व पीएमपीएमएल बसेसचा वापर करावा. तसेच लक्ष्मी रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने योग्य अंतरावर पार्किंग करावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
शनिवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते सकाळी लक्ष्मी रस्त्यावर ‘लक्ष्मी रोड ओपन स्ट्रीट मॉल’ या उपक्रमाचे उद्घाटन होणार असून, यावेळी ‘चालण्याचा आनंद’ या पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर दिवसभर पथनाट्य, संगीत असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.