‘लक्ष्मी’ने बोहल्यावरून काढला पळ
By admin | Published: November 18, 2016 06:08 AM2016-11-18T06:08:54+5:302016-11-18T06:08:54+5:30
वरपक्षाकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करीत असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लहान वयातच लग्न करून देण्याचे ठरविले.
मंचर : वरपक्षाकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करीत असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लहान वयातच लग्न करून देण्याचे ठरविले. आज लग्नाचा मुहूर्त ठरून लग्नाचे विधीही सुरू झाले. अखेर वधूने १00 नंबरवर संपर्क साधून हा प्रकार पोलिसांना कळविला. मात्र हे कळताच विधी उरकण्याची लगबग सुरू झाली. हार घालण्याची बळजबरी होताच ‘लक्ष्मी’ने बोहल्यावरून पळ काढला.
ही घटना आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे घडली. याप्रकरणी मुलीचे आई, वडील, मध्यस्थ, मुलगा व त्याचे आई वडील अशा सहा जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी ऊर्फ नंदिनी सुरेश पाईकराव (वय १६ वर्षे १0 महिने, मूळ रा. बासंभा, हिंगोली. सध्या रा. रांजणी गावठाण) हिने स्वत: फिर्याद दिली आहे.
आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लक्ष्मीच्या आई-वडिलांच्या ओळखीच्या कविता बाळासाहेब गायकवाड हिने घरी येऊन लक्ष्मीच्या लग्नाबाबत विचारपूस केली. नागापूर येथील लक्ष्मण नामदेव गायकवाड यांचा मुलगा पंकेश याच्याबरोबर लग्नाची मागणी घातली. लक्ष्मीच्या आईने आमची परिस्थिती नसून तिचे लग्न सध्या करणार नसल्याचे सांगितले. मात्र मध्यस्थी कविताने तुम्ही काही खर्च करू नका, मुलाकडील लग्नाचा सर्व खर्च करतील असे सांगितले.
दसऱ्याच्या दिवशी ११ आॅक्टोबरला नागापूर येथे जाऊन लक्ष्मीचा गंधाचा कार्यक्रम झाला. या वेळी लक्ष्मी नाइलाजास्तव गप्प राहिली. घरी आल्यावर तिने माझे लग्नाचे वय पूर्ण झाले नसून, मी लग्नाला तयार नसल्याचे आईवडिलांना सांगितले. त्या वेळी तिच्या आईवडिलांनी, आपली परिस्थिती बेताची, गरिबीची आहे. समोरील लोक सर्व खर्च करणार आहेत, तेव्हा तू गप्प राहा असे सुनावले. लग्नासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी लक्ष्मीच्या आईवडिलांना मुलाकडून २0 हजार रुपये देण्यात आले. मुलाकडून लग्नपत्रिका छापण्यात येऊन १६ नोव्हेंबरला सायंकाळी ५.२१ हा मुहूर्त धरण्यात आला.
यासंदर्भात लक्ष्मी ऊर्फ नंदिनी सुरेश पाईकराव हिने मंचर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी लक्ष्मीचे वडील सुरेश किसन पाईकराव, आई पार्वती सुरेश पाईकराव,मध्यस्थ कविता बाबासाहेब गायकवाड, सर्व रा. रांजणी, होणारा पती पंकेश लक्ष्मण गायकवाड, त्याचे वडील लक्ष्मण नामदेव गायकवाड, आई लीलाबाई लक्ष्मण गायकवाड यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला गेला. पुढील तपास फौजदार बी. एस. घाटगे करीत आहेत.