ढिसाळ कारभाराचा लालमहालाला फटका; सुशोभिकरणाच्या नावाखाली चार वर्षांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:12 AM2019-09-17T11:12:25+5:302019-09-17T11:17:46+5:30
शिवाजीमहाराजांच्या जडणघडणीतील महत्त्वपूर्ण व शाहिस्तेखानाची बोटे जेथे छाटली गेली असा हा लालमहाल इतिहासाच्या पुस्तकातून संपूर्ण जगासमोर आहे़
पुणे : छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जीवनावर आधारित कोट्यवधी रुपयांची शिवसृष्टी उभारण्याच्या वल्गना करणाऱ्या पुणे महापालिकेने, गेल्या चार वर्षांपासून सुशोभिकरणाच्या नावाखाली पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा लालमहाल बंद ठेवला आहे़. निधीच्या अर्धवट तरतुदी, निधी उपलब्ध करूनही त्याचा वेळेत उपयोग न करणे, कासवगतीने सुरू असलेले काम व काम पूर्णत्वास नेण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव यामुळे हा लालमहाल पुणेकरांसह शहराबाहेरून येणाऱ्या पर्यटकांना केवळ दूरून दर्शन साजरे असाच ठरत आहे़..
शिवाजीमहाराजांच्या जडणघडणीतील महत्त्वपूर्ण व शाहिस्तेखानाची बोटे जेथे छाटली गेली असा हा लालमहाल इतिहासाच्या पुस्तकातून संपूर्ण जगासमोर आहे़. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून तो अनेक वादांमध्ये पोलीस बंदोबस्तात व काटेरी तारांच्या कुंपणातच राहिला़. लालमहालातील शिल्पाचा वाद मिटल्यावर याच्या सुशोभीकरणाचा विषय चर्चिला गेला आणि लालमहाल विकासाचा मास्टर प्लॅनही तयार झाला़. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात लालमहालाच्या विकासाकरिता ५० लाख रुपयांची तरतूद केली गेली. अखेर २०१६ मध्ये या सुशोभीकरणाला प्रारंभ झाला़. एका वर्षाच्या आत सुशोभित व दुरुस्ती केलेला लालमहाल पर्यटकांसाठी उपलब्ध होईल, असे बोलले गेले, परंतु घडले उलटेच. गेल्या ४ वर्षांपासून लालमहालाबाहेरील ‘सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम चालू असल्याने लालमहाल बंद आहे’ हा फलकच पर्यटकांना दिसत आहे़. सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातील तरतुदीनंतर पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली़. मात्र, पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे व टेंडर प्रक्रियेतील कासवगती यामुळे हा निधी पूर्णपणे वेळेत खर्च झाला नाही़. यामुळे तरतुदीपैकी ५० लाख रुपये लॅप्स झाले़ याचवर्षी लालमहालातील विद्युतविषयक कामांकरिताही ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती़. परंतु, तीही अद्याप खर्ची पडलेली नाही़. सन २०१८-१९ च्या पालिकेच्या अर्थसंकल्पात या लालमहालाच्या कामाकरिता निधीची तरतूदच नसल्याने पालिकेच्या भवन विभागासही हातावर हात धरून बसण्याशिवाय पर्याय उरला नाही़. यामुळे सात ते आठ महिने हे काम पूर्णपणे बंद होते़. सद्य:स्थितीला पालिकेच्या भवन विभागाकडून लालमहालाच्या नूतनीकरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे़.
.........
चारवेळा ठेकेदार बदलले
लालमहालाच्या नूतनीकरणाच्या कामाकरिता आत्तापर्यंत चारवेळा ठेकेदार बदलेले गेले आहेत़. वेळेत निधी मिळत नसल्याने त्यांच्याकडूनही हे काम होत नाही़.
..........
पालिकेचा हलगर्जीपणाच जबाबदार
लालमहाल नूतनीकरणाकरिता आम्ही भरीव तरतूदीची मागणी अर्थसंकल्पात केली़. मात्र, या कामाकरिता तुकड्या -तुकड्याने निधी दिला गेला़ पर्यायाने हे काम रखडले गेले़. गेल्या चार वर्षांपासून हा लालमहाल नूतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे़ .यास केवळ पालिकेचा हलगर्जीपणा व ढिसाळ कारभारच जबाबदार आहे़.
रविंद्र धंगेकर, बाळा शेडगे़
.........
पुणे दर्शनमध्ये बाहेर गावच्या पर्यटकांना या लालमहालात सध्या नेले जात नाही़. केवळ शनिवावाडा येथे या पर्यटकांना शेजारी लालमहाल आहे हे सांगितले जाते़ .कित्येक दिवस नुतकीकरणामुळे हजारो पर्यटक लालमहालापासून दूर राहिले गेले आहेत़.