लाल मातीचा आखाडा ६९व्या वर्षी गाजविला, महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत खेळण्याचे तात्यांचे स्वप्न पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:43 AM2017-11-29T02:43:09+5:302017-11-29T02:43:46+5:30

लाल मातीचं आणि त्यांचं नातं जवळपास ५० वर्षे जुनं आहे. वस्ताद म्हणून वालचंदनगरच्या पंचक्रोशीत तात्यांचा दबदबा... तात्यांना वाटायचं, एकदा तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घ्यावा. वयाची अट स्पर्धेला नव्हतीच, मग काय वस्ताद चाँद इस्माईल शेख यांच्या ६९ वर्षांच्या या पठ्ठ्यानं थेट निवड चाचणीच्या स्पर्धेत भाग घेतला.

 Lal Mata's Akhada was celebrated in the 69th year, dreaming of playing in Maharashtra Kesari tournament | लाल मातीचा आखाडा ६९व्या वर्षी गाजविला, महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत खेळण्याचे तात्यांचे स्वप्न पूर्ण

लाल मातीचा आखाडा ६९व्या वर्षी गाजविला, महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत खेळण्याचे तात्यांचे स्वप्न पूर्ण

Next

- रवीकिरण सासवडे
बारामती : लाल मातीचं आणि त्यांचं नातं जवळपास ५० वर्षे जुनं आहे. वस्ताद म्हणून वालचंदनगरच्या पंचक्रोशीत तात्यांचा दबदबा... तात्यांना वाटायचं, एकदा तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घ्यावा. वयाची अट स्पर्धेला नव्हतीच, मग काय वस्ताद चाँद इस्माईल शेख यांच्या ६९ वर्षांच्या या पठ्ठ्यानं थेट निवड चाचणीच्या स्पर्धेत भाग घेतला. दोन पैलवानांना आसमान दाखवून तालुक्यातून ६१ किलो वजनी गटात दुसरा क्रमांक मारून लाल मातीचा आखाडा खºया अर्थानं गाजवला.
लासुर्णे (ता. इंदापूर) येथील रहिवासी असलेल्या शंकर कृष्णा निंबाळकर या ६९ वर्षांच्या पैलवानाची ही प्रेरणादायी कहाणी. कुस्तीच्या आखाड्यात शंकर निंबाळकर यांना तात्या नावानं ओळखलं जातं. वालचंदनगरचा बाहुबली आखाडा प्रसिद्ध आहे. या आखाड्यातच सर्वात प्रथम तात्यांनी वस्ताद चाँद इस्माईल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून तात्यांच्या नसानसांत कुस्ती भिनलेली. आताही तात्या या आखाड्यात मल्लांना मार्गदर्शन करतात. त्यांच्याकडे २१ मुले कुस्ती शिकायला येतात. या मुलांना तात्या कुस्तीच्या ३६ डावांचे प्रशिक्षण देतात. वयाची ६९ वर्षे पार केली तरी तात्यांच्या देहबोलीत व बोलण्यात कोठेही वृद्धत्वाची झाक दिसत नाही. भल्या पहाटे उठून व्यायाम केल्याशिवाय तात्यांचा दिवस सुरूच होत नाही. त्यानंतर दिवसभर शेतातील कामे करून पुन्हा व्यायामाला येणाºया मल्लांना कुस्तीचा डाव शिकवायचे, असा तात्यांचा नित्यक्रम आहे. अनेक मल्लांना मार्गदर्शन करणाºया तात्यांनी आतापर्यंत कधीही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घेतला नव्हता. तात्यांना वाटायचं, आपण एकदा तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घ्यावा. या स्पर्धांना वयाची अट नसते. सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धांसाठी तालुकापातळीवरील निवड चाचणीच्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा निश्चय तात्यांनी केला. त्यासाठी ४ महिन्यांपासून त्यांनी तायारी सुरू केली. इंदापूरच्या मारकड कुस्ती केंद्रात तात्यांनी नावनोंदणी केली. वडापुरीच्या आखाड्यात सोमवारी निवड चाचणीच्या स्पर्धा रंगल्या. या स्पर्धेत पंचविशीतील २ मल्लांना तात्यांनी काही मिनिटांतच अस्मान दाखवलं.
वडापुरीचा आखाडा बेभान होऊन तात्यांचं कुस्तीचं कसब पाहत होता. कुस्तीशौकिनांनीटाळ््याच्या सलामीत तात्यांचं कौतुक केलं. आता पहिल्या क्रमांकासाठी कुस्ती लागणार होती. मात्र तात्यांनी त्या पैलवानाला कुस्ती न खेळता पुढे खेळण्याची संधी दिली आणि दुसरा क्रमांक स्वीकारला.

तरुणपण एकदाच मिळते....

मला फक्त महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या आखाड्याची लाल माती अंगाला लावायची होती. तरुणपण माणसाला एकदाच मिळते. मात्र वय झालं तरी ते योग्य व्यायाम आणि योग्य खुराकामुळे माणसाला टिकवता येते. मीही तेच केले. ३२ वर्षे कुस्तीची मैदाने मी भरवली. त्यामुळे वाटायचं, की आपणही मानाच्या समजल्या जाणाºया महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घ्यावा. इच्छा असेल तर तुमचे वय आडवे येणार नाही. आता नाही तर कधीच नाही, या वेडानेच मी स्पर्धेत भाग घेतला. दोन पैलवान चितपट केले. तालुक्यात ६१ किलो वजनी गटात दुसरा क्रमांक मिळाला. पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये समोरील मल्लाला बाय दिला. कारण मला आता काही कुस्तीत करिअर करायचं नाही, अशी प्रतिक्रिया वस्ताद शंकर निंबाळकर यांनी दिली.

वस्ताद शंकर निंबाळकर यांचे धाडसी कुस्ती कशी करावी, कोणत्या वेळी कोणता डाव कसा मारावा, अशा एकूण ३६ डावांचे प्रशिक्षण व्हिडीओ यू-ट्यूबवरदेखील उपलब्ध आहेत. ६९ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घेणाºया आणि दोन मल्लांना चितपट करणाºया या रांगड्या पैलवानाचं परिसरातून कौतुक होत आहे.
 

Web Title:  Lal Mata's Akhada was celebrated in the 69th year, dreaming of playing in Maharashtra Kesari tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.