लालन सारंग : बोल्ड भूमिकांबरोबरच अभिनयाचाही कस  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 06:03 AM2018-11-10T06:03:36+5:302018-11-10T06:04:00+5:30

रंगमंचावर ज्या भूमिका करायचे कुणी धारिष्ट्य दाखविणार नाही अशा ‘सखाराम बार्इंडर’मधील चंपा असो की ‘जंगली कबूतर’मधील ‘गुल’ या बोल्ड भूमिका साकारून ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी रंगभूमीवर नवा अध्याय सुरू केला.

Lalan Sarang: With bold role as well as acting | लालन सारंग : बोल्ड भूमिकांबरोबरच अभिनयाचाही कस  

लालन सारंग : बोल्ड भूमिकांबरोबरच अभिनयाचाही कस  

googlenewsNext

पुणे  - रंगमंचावर ज्या भूमिका करायचे कुणी धारिष्ट्य दाखविणार नाही अशा ‘सखाराम बार्इंडर’मधील चंपा असो की ‘जंगली कबूतर’मधील ‘गुल’ या बोल्ड भूमिका साकारून ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी रंगभूमीवर नवा अध्याय सुरू केला. केवळ प्रतिमांमध्ये न अडकता अभिनयाचा कस लावणाऱ्या ‘सूर्यास्त’, ‘रथचक्र’सारख्या नाटकांमधूनही त्यांनी सशक्त अभिनयाचे दर्शन घडविले.
त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीच्या कारकिर्दीला २०१७ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली.
लालन सारंग या मूळच्या गोवेकरी. २६ डिसेंबर १९४१ रोजी त्यांचा जन्म झाला. महाविद्यालयातच त्यांचे रंगभूमीवर पहिले पाऊल पडले. कमलाकर सारंग यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. मुलाच्या जन्मानंतर दोन वर्षे त्या रंगभूमीपासून दूरच राहिल्या. त्यानंतर नोकरी सोडून डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत एक नाटक आणि त्यानंतर अत्रे थिएटर्सच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीचा श्रीगणेशा त्यांनी केला. ‘लग्नाची बेडी’ नाटकात यामिनीची भूमिका करताना त्यांनी गाणेही गायले. संजीवकुमार, राजेश खन्ना यांच्याबरोबर त्यांनी हिंदी रंगभूमीही गाजवली. सत्यदेव दुबे यांच्या ‘स्टील फ्रेम’ नाटकामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. कणकवलीतील ८७व्या मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
बाइंडरची ‘चंपा’
१९७१ मध्ये कमलाकर सारंग यांच्या हातात विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बार्इंडर’ हे नाटक आले. तेंडुलकरांनी ‘चंपा’च्या भूमिकेसाठी त्यांना नाकारले होते; पण त्यांचे ‘स्टील फ्रेम’ नाटक पाहून त्यांना संधी दिली. कमलाकर सारंग यांचे पहिलेच दिग्दर्शन वादग्रस्त ठरले. शिवसेनेने नाटक बंद पाडले. सेन्सॉरविरुद्ध लढा द्यावा लागला. या संघर्षाच्या काळात त्या पतीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.
अभिनयाचा कस
आक्रोश (वनिता), आरोप (मोहिनी), उद्याचा संसार, उंबरठ्यावर माप ठेविले, कमला (सरिता), कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय), खोल खोल पाणी (चंद्राक्का), गिधाडे (माणिक), घरकुल, घरटे अमुचे छान (विमल), चमकला ध्रुवाचा तारा, जंगली कबुतर (गुल), जोडीदार (शरयू), धंदेवाईक (चंदा) बिबी करी सलाम, बेबी (अचला), मी मंत्री झालो, रथचक्र ( ती), संभूसांच्या चाळीत, सहज जिंकी मना (मुक्ता) अशा अनेक नाटकांमधून स्वत:चे वेगळेपण त्यांनी सिद्ध केले.
गोवेकरणीचे ‘मासेमारी’
सीफूड बनविण्यात त्यांचा हातखंडा होता. पुण्यात ‘मासेमारी’ नावाचे हॉटेल त्यांनी सुरू केले. या पदार्थांसाठी त्या स्वत: मसाले तयार करायच्या. या पाककृतींवर आधारित पुस्तकेही त्यांनी लिहिली.

आम्ही एकाच नौकेचे प्रवासी होतो. आम्ही दोघांनी आयएनटीच्या ‘हवा अंधारा कवडसा’ या नाटकात एकत्र भूमिकाही केली होती. लालन गेली तरी भूमिकांच्या माध्यमातून ती कायमच अजरामर राहील. - डॉ. मोहन आगाशे

‘सखाराम बार्इंडर’ मधील सखाराम बरोबर चंपाची भूमिकाही मैलाची दगड ठरणारी होती. चंपा हे अतिशय रांगडे आणि वेगळ्या धाटणीचे व्यक्तिमत्व होते. ते काम आश्वासक पद्धतीने लालनने साकारले. तिच्या निधनाने रंगभूमीचे नुकसान झाले आहे. - डॉ. जब्बार पटेल

Web Title: Lalan Sarang: With bold role as well as acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू