ललित पाटील पुन्हा येरवडा कारागृहात; ‘सीडीआर’मधून महत्त्वाची माहिती हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:13 PM2023-11-25T12:13:20+5:302023-11-25T12:14:01+5:30
हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे, इब्राहम शेख यांचे कॉल डिटेल्स तपासले...
पुणे : आरोपी हरीश पंत, अरविंदकुमार लोहारे, इब्राहम शेख यांच्या ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स) तपासणीतून महत्त्वाची माहिती हाती आली आहे. या तिघांचे ‘बँक डिटेल्स’ मिळाले आहेत. त्याचाही तपास बाकी आहे. मात्र, ते तपासाला सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे त्यांची कोठडी वाढवून द्यावी, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यानुसार भूषण पाटीलसह तिघांच्या पोलिस कोठडीत २९ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी शुक्रवारी पाटीलसह जिशान शेख, शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. अमली पदार्थ तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात ललित पाटीलसह आठ आरोपींची कोठडी शुक्रवारी संपल्याने त्यांना दुपारी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
अरविंद लोहारे याने हा कट रचला आहे. आणखी काही जणांचा या कटात सहभाग आहे का? याचा तपास करायचा आहे. तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत, त्याबाबतही अधिक तपास करायचा आहे, इब्राहम शेख हा नागपूर येथील अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात फरार होता, त्याचा तपास करणे बाकी आहे. असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तर, आरोपींना त्रास देण्याच्या हेतूने पोलिस सातत्याने कोठडी वाढवत आहेत. कोठडीची मागणी करताना पोलिस मांडत असलेल्या मुद्द्यात काहीही नवीन नाही. तसेच, काही नवीन गोष्ट मिळालेली नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी चार आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.