Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टरला जामीन
By विवेक भुसे | Updated: December 14, 2023 16:04 IST2023-12-14T16:03:57+5:302023-12-14T16:04:44+5:30
येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात दाखल होण्यासाठी डॉ. संजय मरसाळे याने मदत केल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेने डॉ. संजय मरसाळे याला अटक केली होती....

Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टरला जामीन
पुणे :ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या येरवडा कारागृहातील डॉक्टरची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. डॉ. संजय मरसाळे असे या डॉक्टरचे नाव आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून ड्रग्जचा पुरवठा करीत असल्याचे समजल्यावर गुन्हे शाखेने कारवाई करून त्याच्या सहकाऱ्यांना २ कोटींच्या अमली पदार्थांसह पकडले होते. त्यानंतर ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात दाखल होण्यासाठी डॉ. संजय मरसाळे याने मदत केल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेने डॉ. संजय मरसाळे याला अटक केली होती.
आरोपीच्या वतीने ॲड. शेख इब्राहिम अब्दुल यांनी जामीन अर्जावर युक्तिवाद केला की, आरोपीने ललित पाटील यास पळून जाण्यासाठी कोणतीही मदत केलेली नाही. आरोपीविरुद्ध पोलिसांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्याने आपले कर्तव्य पार पाडत असताना कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. २९ वर्षांच्या नोकरीमध्ये त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही, त्यामुळे त्याला जामीन मिळावा. या सर्व बाबी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. ॲड. शेख याना ॲड. अशरफ शेख, ॲड. विनायक माने, ॲड. फैजान शेख यांनी सहकार्य केले.