ललित पाटील ताब्यात असताना नीट सांभाळता आले नाही, आता...! न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना सुनावले
By नम्रता फडणीस | Published: October 11, 2023 07:07 PM2023-10-11T19:07:12+5:302023-10-11T19:08:44+5:30
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती
पुणे : इतके दिवस ललित पाटील तुमच्या ताब्यात असताना त्याला नीट सांभाळता आले नाही आणि आता भूषण व अभिषेक या आरोपींसाठी पोलिस कोठडी मागताय? त्यांच्याकडे काय तपास करणार? पोलिस खाते पणाला लागल्यामुळे पोलिस कोठडी मागताय का? अशा शब्दांत न्यायालयाने तपास अधिका-यांना सुनावले. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायाधीशांनी चौदा दिवसांची पोलिस कोठडी दिली तर जेव्हा मुख्य आरोपी ललित पाटील सापडेल तेव्हा दोघांना पुन्हा पोलिस कोठडी मिळणार नाही. नवीन कायदा आलाय माहितीये ना? एकाच वेळी चौदा दिवसांची पोलिस कोठडी घेणे योग्य होणार नाही असे सांगत न्यायालयाने दोघा आरोपींना चौदा दिवसांची पोलिस कोठडी न देता दि. 16 आँक्टोबर पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.
ससून ड्रग रँकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ आणि मेफेड्राँन बनविणारा भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी मंगळवारी (दि.10) नेपाळ बाँर्डरवर पकडले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ललित पाटील पळून गेल्याने मागील काही दिवसांपासून पोलीस खात्यावर आणि त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
त्यावरुन पोलिस खाते पणाला लागल्यामुळे पोलिस कोठडी मागताय का? असा सवालही न्यायाधीशांनी केला. यावेळी न्यायालयाने भूषण आणि अभिषेक या दोघांना तुमचे वकील कोण? अशी विचारणा केली. त्यावर आम्हाला वकील दिलेले नाहीत असे त्यांनी न्यायाधीशांना सांगितलं. त्यानंतर न्यायाधीशांनी या दोन आरोपींना सरकारी खर्चातून वकील देण्याचे आदेश दिले. न्यायालयात हजर असलेल्या वकिलांना तुमच्यापैकी कोणी या दोन आरोपींचे वकीलपत्र घेण्यास तयार आहे का? असे विचारले. त्यानंतर न्यायालयात उपस्थित एक वकील आरोपींचे वकीलपत्र घ्यायला तयार झाला. न्यायालयाने थोडा वेळ कामकाज थांबविले आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे दोघांच्या वतीने रितसर अर्ज करण्यास न्यायालयाने वेळ दिला. त्यानंतर विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने अँड यशपाल पुरोहित आणि चैतन्य दीक्षित यांनी दोघांचे वकीलपत्र न्यायालयात सादर केले. त्याप्रमाणे आरोपींच्या बाजूने अँड पुरोहित यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
एखादे सलून काढायचे म्हटले तरी पोलिसांना कळते
ललित पाटील पोलिसांच्या नजरकैदेतून पसार झाला, त्यामुळे पोलिसांची सर्वत्र नाचक्की झाली आहे, या पार्श्वभूमीवर एखादे सलून काढायचे म्हटले तरी पोलिसांना कळते. पण ललित पाटील पसार झालेला पोलिसांना कळत नाही अशी टिप्पणीही न्यायाधीशांनी केली.