Lalit Patil escape case: तीन महिन्यांपूर्वीच ललित पाटीलने केला होता पळून जाण्याचा प्लॅन!
By नम्रता फडणीस | Updated: November 30, 2023 18:22 IST2023-11-30T18:21:09+5:302023-11-30T18:22:14+5:30
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत....

Lalit Patil escape case: तीन महिन्यांपूर्वीच ललित पाटीलने केला होता पळून जाण्याचा प्लॅन!
पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ललित पाटील पळून गेला असला तरी त्यापूर्वीच तीन महिने आधीपासून ललितने पळून जाण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी ललित हा वाघ याला भेटण्यासाठी दोन ते तीन वेळा तो ससून रुग्णालयातून बाहेर गेला होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये एक गुन्हा अमली पदार्थ तस्करीचा आहे. तर, दुसरा गुन्हा न्यायालयीन कोठडी अंतर्गत ससून रुग्णालयात उपचार घेत असताना, तेथून पळून गेल्याप्रकरणी दाखल आहे. या दुसऱ्या गुन्ह्यात ललित पाटीलसह त्याचा चालक सचिन वाघ या दोघांना बुधवारी प्रथमच अटक करण्यात आली.
त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ललित पाटीलला सात दिवस आणि वाघ याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला त्यावेळी सचिन वाघ त्याच्यासोबत होता. दोघेही परराज्यात सोबतच गेले होते. मुंबई पोलिसांनी त्यांना बंगळुरू येथून अटक केली. दरम्यान, वाघ आणि ललित पाटील दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. ललितला पळून जाण्याच्या कटात वाघने सहकार्य केले. पैसे आणि कार उपलब्ध करून दिली, त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशीसाठी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी सहायक सरकारी वकील नीलिमा यादव इथापे यांनी केली. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी त्यांची मागणी मान्य केली.