ललितच्या दोन साथीदारांना अटक; मोक्का न्यायालयाने दहा आरोपींना सोमवारपर्यंत सुनावली पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 09:04 AM2023-11-17T09:04:28+5:302023-11-17T09:04:54+5:30
नाशिकप्रमाणेच पुण्यातही आरोपींना अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उघडायचा होता, अशी माहिती तपासातून समोर येत आहे.
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलप्रकरणी इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याला कुर्ला ईस्ट येथून, तर आरोपी हरिश्चंद्र पंत याला बोईसर मुंबई येथून बुधवारी पुणे पोलिसांनी अटक केली. या दोघांसह या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आठ आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींना मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातही उघडायचा होता कारखाना
नाशिकप्रमाणेच पुण्यातही आरोपींना अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उघडायचा होता, अशी माहिती तपासातून समोर येत आहे.
...आणखी चार जणांची नावे आली पुढे
ललित पाटील प्रकरणात आणखी चार जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हरिश्चंद्र पंत हा शिंदे गाव एमआयडीसी नाशिक येथे सुरू केलेल्या मेफेड्रोन निर्मिती कारखान्यामध्ये प्रशिक्षण, उत्पादन आणि विक्रीमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. ललित पाटील आणि अरविंद लोहारे यांच्या सांगण्यावरून त्यांनी तसे केले होते. इम्रान शेख ऊर्फ अतिक अमीर खान याने मेफेड्रोनची मुंबई येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सुभाष जानकी मंडल, रौफ रहीम शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, अरविंदकुमार लोहारे आणि प्रज्ञा कांबळे यांना येरवडा कारागृहातून, तसेच रेहान ऊर्फ गोलू याला तळोजा कारागृह, झिशान इकबाल शेख याला आर्थर कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटद्वारे पुन्हा ताब्यात घेतले.
प्रज्ञा कांबळे हिचा जामीन फेटाळला
एमडी विक्रीतील पैशांतून वेळोवेळी ललित पाटील, अभिषेक बलकवडे आणि भूषण पाटील यांनी प्रज्ञा कांबळे हिला उदरनिर्वाहासाठी तसेच चारचाकी, मोबाइल घेण्यासाठी कॅश आणि अकाउंटवर पैसे दिले होते.आरोपी भूषण पाटील याच्या मोबाइलमध्ये झिशान शेख व प्रज्ञा कांबळे या दोघांचे एमडी फॅक्टरी व इतर बाबींवरील संभाषण पोलिसांना प्राप्त झाले आहे. मोक्कांतर्गत प्रज्ञा कांबळे हिला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला. तिच्या तपासातून ललितचे आणखी कारनामे समोर येतील, अशी शक्यात पोलिस सूत्रांनी बोलून दाखविली.