डाॅ. ठाकूर यांच्या सांगण्यावरूनच ललित पाटीलवर केले उपचार - डाॅ. देवकाते
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 10:27 AM2023-11-14T10:27:30+5:302023-11-14T10:28:10+5:30
उपचार पूर्ण झाल्यावर मी पाटील याला अधिष्ठातांच्या सर्जरी युनिटला पुढील उपचारासाठी पाठविण्याबाबत वेळाेवेळी काॅल करूनही त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही
पुणे : ललित पाटील माझ्या मर्जीने नव्हे, तर अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्या निर्देशानुसारच माझ्या ऑर्थाेपेडिक युनिटला त्याला दाखल केले आणि त्याच्यावर उपचारही केले. तपासण्यांच्या नावाखाली गरज नसताना त्याला माझ्या युनिटला ठेवण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यावर मी पाटील याला अधिष्ठातांच्या सर्जरी युनिटला पुढील उपचारासाठी पाठविण्याबाबत वेळाेवेळी काॅल करूनही त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे माझ्या युनिटला जास्त दिवस ताे राहिला. उलट माझ्या युनिटला जास्त दिवस ठेवल्याचे कारण पुढे करीत मला बळीचा बकरा बनवले जात आहे,’ अशी प्रतिक्रिया ललित पाटील प्रकरणात निलंबनाच्या कारवाईला सामाेरे जावे लागलेले ‘ससून’मधील डाॅ. प्रवीण देवकाते यांनी दिली.
ललित पाटील प्रकरणात डाॅ. देवकाते यांनी माेठा खुलासा केला असून त्यामध्ये त्यांनी अधिष्ठाता तसेच सहकारी डाॅक्टरांवर संताप व्यक्त केला आहे. डाॅ. देवकाते म्हणाले की, माझ्या युनिटमध्ये उपचार सुरू असताना त्याच्यावर पाेलिसांची कारवाई झालेली नाही किंवा ताे पळूनही गेला नाही. ही कारवाई झाली आणि ताे पळून गेला तेव्हा ताे अधिष्ठाता यांच्या युनिटला हाेता. मात्र, निलंबन माझे करण्यात आले. ज्या कारणामुळे माझे निलंबन करण्यात आले ते चुकीचे आहे. हा माझ्यावर झालेला अन्याय आहे, असेही ते म्हणाले.
नुकताच वैद्यकीय शिक्षण विभागाने ललित पाटील प्रकरणी ‘ससून’चे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांचा पदभार काढला, तर डाॅ. प्रवीण देवकाते यांना निलंबित केले. मात्र, डाॅ. देवकाते यांनी ठाकूर यांच्या सांगण्यावरूनच पाटील याला दाखल केले आणि मुद्दाम लवकर सर्जरी विभागात त्याला उपचारासाठी ट्रान्स्फर केले नाही. या प्रकरणातून डाॅ. ठाकूर यांच्यावरच संशयाची सुई गडद हाेत आहे. तर वैद्यकीय शिक्षण विभागातील आयुक्त आणि सचिव मात्र, डाॅ. ठाकूर यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत का? असाही प्रश्न उपस्थित हाेत आहे.