ललित पाटीलचा भाऊ भूषणला वाराणसीतून अटक; पुण्यातील ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 10:56 AM2023-10-11T10:56:29+5:302023-10-11T10:57:01+5:30
ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता.
पुणे : ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ आणि मॅफेड्रॉन स्वत: बनवणारा भूषण पाटील याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथील वाराणसीतून मंगळवारी सकाळी पकडले.
ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. त्यानंतर पुणे पोलिसांची १० पथके त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विभागाने ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींपेक्षा अधिक रकमेचे एमडी (मॅफेड्रॉन) पकडल्यानंतर यातील मुख्य आरोपी ललित आणि त्याचा भाऊ भूषण असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.
गेल्या आठ दिवसांपासून चकवा देणारा भूषण सापडल्याने पुणे पोलिसांच्या आशा आता उंचावल्या आहेत. भूषणच्या आधारे लवकरच पोलिस ललितपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे भूषणला ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने ‘लोकमत’ला सांगितले.
भाड्याच्या गाेदामाचे आर्थिक ‘खोदकाम’
- नाशिक : एमडी साठा व कच्च्या मालासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाेदामाच्या गाळामालकाशी केलेले ऑनलाइन आर्थिक व्यवहारांचे खोदकाम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.
- गाेदाम उभा करणारा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही, यामुळे आता पोलिस त्याचा माग काढण्यासाठी सुगावा शोधत आहेत.
- हे गाेदाम दत्तू जाधव यांच्या मालकीचे असून, ते भाडेतत्त्वावर घेण्यात आलेले होते.
काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली
ललित पाटील हा नाशिकमध्ये एमडी पावडरचा कारखाना चालवीत होता. तो उद्ध्वस्त करतानाच नाशिकमध्ये काही स्थानिक ड्रग विक्रेत्यांनाही पकडले आहे. मात्र, काही स्थानिक आमदार या ड्रग्ज माफियांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यावर राजकारण रंगले असून, भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पटोले यांना संंबंधितांची नावे जाहीर करावी, असे आव्हान दिले आहे.