ललितचा भाऊ भूषण पाटील पुणे पोलिसांना सापडला; उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून घेतले ताब्यात
By नितीश गोवंडे | Published: October 10, 2023 04:27 PM2023-10-10T16:27:08+5:302023-10-10T16:28:23+5:30
ललितचा भाऊ भूषण सापडल्याने पुणे पोलिसांच्या आशा उंचावल्या असून भूषणच्या आधारे लवकरच पोलिस ललितपर्यंत पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जात आहे
पुणे: ससून ड्रग रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ आणि मॅफेड्रॉन स्वत: बनवणारा भूषण पाटील याला पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथील वाराणसीतून मंगळवारी सकाळी पकडले. भूषण पाटलासह त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे याला देखील ताब्यात घेतले आहे. ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. ललित पळाल्यानंतर पुणे पोलिसांची १० पथके त्याच्या शोधार्थ पाठवण्यात आली होती. दरम्यान ३० सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विभागाने ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींपेक्षा अधिक रकमेचे एम डी (मॅफेड्रॉन) पकडल्यानंतर यातील मुख्य आरोपी ललित आणि त्याचा भाऊ भूषण असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते.
गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या ललितचा भाऊ भूषण सापडल्याने पुणे पोलिसांच्या आशा आता उंचावल्या आहेत. भूषणच्या आधारे लवकरच पोलिस ललितपर्यंत पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान ललित आणि भूषण या भावंडांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांसह मुंबई आणि नाशिक पोलिसांची पथके देखील शोध घेत होती. पुणे पोलिसांनी पाटील बंधुंच्या जवळच्या नातेवाईकांसह तांत्रिक तपासाच्या आधारे भूषणला वाराणसीतून ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पुणे पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, लवकरच ललित पाटील याला देखील पोलिसांनी पकडावे आणि या ड्रगच्या विळख्यातून शहराला मुक्त करावे अशी मागणी पुणेकरांमधून होत आहे.
तीन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी मारला होता छापा...
मुंबई पोलिसांच्या साकीनाका पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी नाशिक येथील शिंदे गावात जात भूषण पाटील ज्या कारखान्यात मॅफेड्रॉन बनवत होता तेथे छापा मारला होता. यामध्ये मुंबई पोलिसांनी ३०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते.
भूषण पाटीलसह त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेच्या आवळल्या मुसक्या, पुणे पोलिसांची कारवाई pic.twitter.com/deKYI9L9RL
— Lokmat (@lokmat) October 10, 2023
पाटील बंधुंवर कोणाचा वरदहस्त..
दरम्यान मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयात जात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी धंगेकर यांनी या प्रकरणात शिंदे गटातील एका मंत्र्याचा हात असल्याचे देखील संकेत दिले. तसेच ससून रुग्णालयातून ललितला पळून जाण्यासाठी जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा पोलिस आयुक्तांना भेटून गुन्हा दाखल करण्याची मागणी करीन असे देखील सांगितले. तसेच जोपर्यंत ससून रुग्णालयातील ललितला पाठबळ देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असे देखील धंगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.