श्वानाचा जीव घेऊनही थांबली नाही लॅम्बोर्गिनी; २ वर्षांपासून ‘सूपर कार’ पळविणाऱ्याला वेसण कधी?
By श्रीकिशन काळे | Published: August 10, 2023 04:29 PM2023-08-10T16:29:45+5:302023-08-10T16:33:49+5:30
या वाहनचालकाने त्याला फरपटत नेले...
पुणे : डेक्कन परिसरामध्ये दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीने लॅम्बोर्गिनी ही सूपर कार विकत घेतली होती. तेव्हापासून तो ती अतिशय वेगाने चालवतो. त्यामुळे इतरांना धोका होऊ नये म्हणून दोन वर्षांपूर्वी देखील डेक्कन परिसर समितीने याविषयी आवाज उठवला होता. परंतु, त्यावर काही कारवाई झाली नाही. आता तर त्याने गोपाळ कृष्ण गोखले चौकात (गुडलक चौक) एका श्वानाला फरपटत नेले. हे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील रेकॉर्ड झालेले आहे. त्याचे फुटेज प्राणीप्रेमीने पोलीसांना दिले आहे. त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावरील श्वानाला जोरात धडक देऊन तो कारचालक तसाच पुढे निघून गेला. त्यामुळे हा वाहनचालक नागरिकांसाठी देखील धोकादायक बनला आहे. त्याच्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करून गुन्हा दाखल करण्यात आला.
महागडी गाडी वेगाने चालविण्याचा पराक्रम एक वाहनचालक गेल्या वर्षभरापासून करत आहे. त्याच्याविरोधात पोलीसांमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या सदस्यांनी दोन वर्षांपूर्वी देखील याच वाहनचालकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता. या सूपर कारमुळे बुधवारी एका श्वानाला आपला जीव गमवावा लागला. कारण या वाहनचालकाने त्याला फरपटत नेले. त्यातच त्याचा जीव गेला. या वाहनचालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या वाहनचालकावर भारतीय दंड संहिता १८६० कलम २७९, प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ४२९ असे आणखी दोन कलमातंर्गत डेक्कन पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.