बनावट नोटा फसवणूक प्रकरणात 'लान्स नायक' मुख्य सूत्रधार; मुंबईच्या भेंडी बाजारातून आणल्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:54 AM2020-06-12T00:54:06+5:302020-06-12T11:49:02+5:30
भेंडी बाजारातून आणल्या नोटा
पुणे : बनावट नोटांच्या फसवणूक प्रकरणात 'लान्स नायक' हाच मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या घटनेतील आरोपीचे हवाल्याशी संबंध असून, त्या रॅकेटचे कनेक्शन शोधण्याचे काम सुरु झाले आहे. जप्त केलेल्या नोटा या ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या असल्याचे पुढे आले. त्या नोटा मुंबईच्या भेंडी बाजारातून आणल्या होत्या.
बुधवारी विमाननगर परिसरातील संजय पार्क सोसायटीतील बंगल्यातून एकूण ८७ कोटी ५ लाख ७५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेली रक्कम ही मोठ्या प्रमाणात असल्याने रात्री उशिरापर्यंत तिची मोजणी सुरू होती. शेख अलिम समद गुलाब खान (वय ३६, रा. जेडीसी पार्क, प्रतिकनगर, येरवडा) असे या लान्स नाईकचे नाव असून, तो संरक्षण दलातील बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप खडकी या ठिकाणी लान्स नायक या पदावर कार्यरत आहे. यात आणखी पाच जणांना अटक झाली आहे. लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. चलनामध्ये दोन हजार, एक हजार, पाचशे रुपयांच्या नोटा आहेत. त्यांच्यावर 'चिल्ड्रन बँक आॅफ इंडिया' असे नमूद आहे. नोटा ठेवलेल्या बंगल्याच्या मालकाचा शोध सुरु आहे. आरोपींकडे चौकशी करण्यात आली तेव्हा बनावट चलन मुंबईतील भेंडी बाजारातून आणले असून जप्त केलेल्या बनावट चलनाचा वापर ते फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी करणार असल्याची कबुली दिली आहे.
खोट्या नोटांच्या बंडलाला ‘खऱ्या नोटा’
आरोपींनी मोठ्या चलाखीने फसवणूक करण्याची ट्रीक शोधून काढली होती. खोट्या नोटांच्या बंडलला खºया नोटा लावून त्याद्वारे फसवणूक करण्यात येणार होती. त्यांनी काही लोकांची फसवणूकही केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी स्वस्तात चलन देण्याचे आमिष दाखवणारे व्हिडीओ तयार केल्याची माहिती मिळाली आहे. हे व्हिडिओ ज्यांच्याकडे काळा पैसा आहेत किंवा हवाला करणाऱ्यांना पाठविले जाणार होते, अशी माहिती समोर आली आहे.