उड्डाणपुलाच्या कामासाठी सर्व्हिस रस्त्याचे १५ दिवसात भूसंपादन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:16 IST2024-12-19T10:16:17+5:302024-12-19T10:16:28+5:30

रस्त्याचे काम रखडल्यामुळे कात्रजकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

Land acquisition for service road for flyover work to be completed within 15 days | उड्डाणपुलाच्या कामासाठी सर्व्हिस रस्त्याचे १५ दिवसात भूसंपादन करणार

उड्डाणपुलाच्या कामासाठी सर्व्हिस रस्त्याचे १५ दिवसात भूसंपादन करणार

पुणे : शहरातील कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने सुरू आहे. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारकडून १४० कोटी आले आहेत. त्यातून हे भूसंपादन केले जाणार आहे. येत्या १५ दिवसात हे भूसंपादन मार्गी लागणार आहे, असे पुणे महापालिकेेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूसंपादन होत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. अगोदर ८४ मीटरचा रस्ता करण्यात येणार होता. मात्र भूसंपादनासाठी लागणारा खर्च वाढत असल्यामुळे सुरुवातीला ५० मीटर रस्ता विकसित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पण रस्त्याचे काम रखडल्यामुळे कात्रजकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

शासनाकडून महापालिकेस १४० कोटींचे अनुदान मिळालेले असूनही ही प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे आयुक्तांनी स्वत: बैठक घेत प्रशासनास तातडीनं भूसंपादनाचे आदेश दिले होते. या जागामालकांसोबत तसेच या पुलाच्या कामात कोंढव्याच्या दिशेच्या रॅम्पच्या कामासाठी जागांच्या मालकांची बैठक महापालिका आयुक्तांनी घेतली होती. त्यातून हे भूसंपादन केले जाणार आहे. येत्या १५ दिवसात या भागाचे हे भूसंपादन मार्गी लागणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

२३१ कोटी रुपये भूसंपादनासाठी लागणार

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काही प्रमाणात टीडीआर देऊन भूसंपादन झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तुकड्या तुकड्यामध्ये तयार आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाअभावी रस्त्याचे काम रखडले आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदर रस्त्याची रुंदी ८४ मीटर करावी, अशी सूचना केली हाेती. त्यानुसार महापालिकेने आता या रस्त्याचे ८४ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी पालिकेला भूसंपादनासाठी २३१ कोटी रुपये लागणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. या निधीतून १ लाख ७५ हजार मीटरचे भूसंपादन केले जाणार आहे, असे आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी सांगितले.

Web Title: Land acquisition for service road for flyover work to be completed within 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.