पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:50+5:302021-05-16T04:09:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर : खेड तालुक्यात पुणे-नाशिक दरम्यान नव्या दुहेरी व मध्यम द्रुतगती ब्रॉडगेज लाईनच्या विद्युतीकरणासह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरूनगर : खेड तालुक्यात पुणे-नाशिक दरम्यान नव्या दुहेरी व मध्यम द्रुतगती ब्रॉडगेज लाईनच्या विद्युतीकरणासह बांधकामासाठी जमीन खासगी वाटाघाटीद्वारे, तसेच थेट खरेदी पध्दतीने ताब्यात घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. रेल्वे प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना नोटिसा देणे, जमीन संपादनासोबतच आदी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात, खेड प्रांत कार्यालयात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत प्रशासनाची नुकतीच बैठक पार पडली आहे. नाशिक रेल्वे मार्ग देशातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग असणार आहे.
या बैठकीला खेड उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी तसेच महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रेल्वेबाधित शेतकऱ्यांना नोटीस देऊन गावोगावी महसूल विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी बैठका घेणार आहेत. रेडीरेकनरच्या चार ते पाच पट पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे. या सोबतच रेल्वेमार्गिकेला अडथळा येणारी घरे, विहिरी, बोअर, झाडे, पाईपलाईन यांचेही मूल्यांकन होऊन याबाबत संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. तालुक्यातील मांजरेवाडी, होलेवाडी, रासे, केळगाव जैदवाडी, आळंदी गोलेगाव या परिसरात रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. रेल्वेचा मार्ग नक्की कुठून जाणार? हे निश्चित करण्यात आले आहे.
टाकळकरवाडी परिसरात रेल्वे जंक्शन उभारण्यात येणार आहे. काही शेतकरी जमिनी जाणार म्हणून चिंताग्रस्त झाले आहेत. तर काही शेतकरी रेल्वे येणार उत्साहित आहेत. रेल्वेमार्गालगतच्या परिसराच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळू शकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये ‘कही खुशी-कही गम’ असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना नोटिसा संपादन, आदी कामाला वेग आला आहे. पुणे आणि नाशिक ही दोन्ही शहरे जवळच्या लोहमार्गाने जोडण्यासाठी नवा लोहमार्ग तयार करण्यासाठी जाहीर झालेला प्रकल्पाची गाडी तब्बल दहा वर्षांपासून सर्वेक्षणाच्याच स्थानकावर उभी होती. सद्य:स्थितीत या नव्या मार्गासाठी पुन्हा नव्याने सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या नवीन सर्वेक्षणानुसार नवा लोहमार्ग पुणे, हडपसर, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जाबुत, साकूर, अंबोरे, संगमनेर, देवठाण, दोडी, सिन्नर, मुढारी, शिंदे आणि नाशिक रोड, असा नवीन रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला आहे.
चौकट
२३१.७६१ कि.मी. लांबीच्या या मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. त्यामुळे पुणे- नाशिक हे अंतर २३१ किलोमीटरचे होणार आहे. त्यातून प्रवासाचा वेळही वाचणार आहे. नाशिक रेल्वे मार्ग देशातील पहिला हायस्पीड रेल्वे मार्ग असणार आहे. या मार्गावर ताशी २२० कि.मी. वेगाने रेल्वे धावणार आहे. त्यामुळे या दोन शहरांतील अंतर आता केवळ दोन तासांत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आनदांचे वातावरण असले, तरी खेड तालुक्यातील भूमिपुत्रांच्या पुन्हा एकदा रेल्वेच्या मार्गासाठी जमिनी जाणार आहे. या पूर्वी टाकळकरवाडी, होलेवाडी भांबुरवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुणे -नाशिक या बाह्यवळणासाठी गेल्या. त्यातच रेल्वेचेे भूत पुन्हा मानगुटीवर आल्याने पुन्हा जमिनी जाणार काय ? या चिंतेत शेतकरी आहेत.
चौकट
चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव या महत्त्वाच्या शहरांमध्ये महामार्गावर कायमच वाहतूककोंडी होते. यामुळे अपघात, प्रवासी व शेतमालाची गैरसोय, वेळेचा अपव्यय अशा समस्यांनी आज या परिसरातील माणूस ग्रासला आहे. तळागाळातील माणसाला वर आणायचे असेल पुणे-नाशिक रेल्वे झाली तर या भागाचा या परिसराचा कायापालट होईल, अशी भावाना ग्रामस्थ व्यक्त करतात.
चौकट
महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गावेच्या गावे उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. चासकमान धरणाचे पाणी या क्षेत्रात मिळाल्यामुळे या क्षेत्रातील सुपीक जमिनीला मोठा भाव आला आहे. रेल्वे प्रकल्प शेतकऱ्यांचे नुकसान करणारा असून प्रकल्प साकारल्यास विकासाच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांचा नाहक बळी जाणार आहे. तुटपुंजी असलेली बागायती जमीन अधिग्रहित झाल्यावर शेतकरी भूमिहीन होईल, रेल्व प्रकल्प झाला तर या परिसरात गुंडगिरी वाढणार अशी भीतीही ग्रामस्थ व शेतकरी व्यक्त करीत आहे.