बाणेरमधील जागेचा वाद पुन्हा उफाळला
By admin | Published: August 21, 2016 06:32 AM2016-08-21T06:32:51+5:302016-08-21T06:32:51+5:30
बाणेर येथील माजी सैनिकांच्या जागेवरील अतिक्रमण महापालिकेने हटविल्यानंतर पुन्हा तेथे बेकायदेशीरपणे भिंत बांधल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक सनी निम्हण
पुणे : बाणेर येथील माजी सैनिकांच्या जागेवरील अतिक्रमण महापालिकेने हटविल्यानंतर पुन्हा तेथे बेकायदेशीरपणे भिंत बांधल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक सनी निम्हण आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शनिवारी रात्री चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला़ या घटनेनंतर निम्हण आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता़ पोलिसांनी सांगितल्यानंतरही मारामारी केल्याने पोलिसांनी सनी निम्हण आणि सचिन डोंगरे यांना रात्री उशिरा अटक केली आहे़ या घटनेनंतर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता़
बाणेर येथील जमिनीबाबत माजी सैनिक डोंगरे आणि तत्कालिन आमदार विनायक निम्हण यांच्यात अनेक दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे़ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत हा वाद गेला होता़ सर्व्हे क्रमांक ३९/५ ही जागा माजी सैनिकांच्या मालकीची आहे़ या जागेवर बेकायदेशीररीत्या भिंत बांधण्यात आली होती़ महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही भिंत पाडण्याचे आदेश दिले होते़ शनिवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात ही भिंत पाडण्यात आली़ त्यानंतर सनी निम्हण व त्यांचे सहकारी तेथे आले़ त्यांनी पुन्हा तेथे भिंत बांधली़ त्या वेळी माजी सैनिकाचे नातू असलेले सचिन डोंगरे तेथे आले़ निम्हण यांनी डोंगरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली़ तसेच नागरिकांशी वादावादी केली, असे फिर्यादित नमूद केले आहे़
पोलिसांनी सर्वांना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणले़ त्यानंतर निम्हण व डोंगरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमले़ त्याबरोबर पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली़ पोलिसांनी सांगितल्यानंतरही दोघांनी मारामारी केल्याने तसेच पोलिसांशी हुज्जत घातल्याने सनी निम्हण आणि सचिन डोंगरे यांना सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त डॉ़ तेली यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
शिवसेना पक्षप्रमुखांकडे मागणार दाद
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी पुण्यात येत असून, कुमार सप्तर्षी यांच्या गौरव समारंभास ते उपस्थित राहणार आहेत़ बाणेर भागात घडलेल्या प्रकारामुळे निम्हण यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी सर्व नागरिक रविवारी ठाकरे यांची भेट घेणार आहेत़