सरकार मेहेरबान! राज्य सरकारच्या नावे असलेली जमीन डीएसकेंच्या पत्नीच्या नावे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 10:19 AM2023-04-21T10:19:49+5:302023-04-21T10:20:16+5:30
राज्य सरकारने तळेगावातील रस्त्याची जागा डीएसके यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या नावावर करून दिल्याने यात नक्कीच काहीतरी काळेबेरे
नितीन चाैधरी
पुणे : डीएसके प्रकरणातील महसूल विभागाचे घोळ उघड होत असून, राज्य सरकारच्या नावे असलेली तळेगाव येथील जमीन नुकतीच डीएसके यांच्या पत्नी हेमंती यांच्या नावे करण्यात आल्याचे निदर्शनास आले. ही मालमत्ता जप्त करण्यात आली नव्हती, त्यामुळेच हा उद्योग झाला असण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात महसूल यंत्रणेकडून हलगर्जीपणा झाला असल्याने याची चौकशी एसआयटीकडून व्हावी, अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत.
डीएसके समूह अडचणीत आल्यानंतर राज्य सरकारने डीएसके यांच्या ३३५ मालमत्ता जप्त केल्या. या मालमत्ता विक्रीतून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील, अशी आशा होती. मात्र यातील ५२ मालमत्ता वगळता अन्य मालमत्ता वादातीत असल्याने त्यांची विक्री होऊ शकली नाही. याबाबत मालमत्तांच्या विक्रीबाबतही न्यायालयाने अद्याप स्पष्ट आदेश न दिल्याने त्यांची विक्री होऊ शकली नाही.
दुसरीकडे डीएसके यांच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या नाहीत, याबाबत महसूल विभागाने १९ मालमत्तांची यादी मंत्रालयात पाठवली, मात्र त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही. या मालमत्तांच्या व्यतिरिक्त तळेगाव येथील डीएसके सदाफुली ही मालमत्ताही जप्त करण्यात आली नव्हती. हा प्रकल्प २०१३ मध्ये सुरू करण्यात आला होता.
मालमत्ता जप्त न केल्यामुळे नुकसान
डीएसके समूह अडचणीत आल्यामुळे हा प्रकल्पही रखडला. यातील १३९ फ्लॅटधारकांनी महारेराकडे तक्रार केल्यानंतर महारेराने त्रयस्थ बिल्डरला हा प्रकल्प पुनर्विकसित करण्यास परवानगी दिली. त्यामुळे दहा वर्षांनंतर येथील १३९ फ्लॅटधारकांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याचवेळी ११२ फ्लॅट विकले गेले नव्हते. हे फ्लॅट त्याच बिल्डरला विकण्यास मुभा दिली. त्यातून त्याला ४२ कोटी रुपये मिळाले. हा व्यवहार बेकायदा झाला असून, गुंतवणूकदारांचे ४२ कोटींचे नुकसान झाले आहे. ही मालमत्ता विकून ती रक्कम न्यायालयात जमा करता आली असती. मात्र महसूल विभागाने ही मालमत्ता जप्त न केल्याने नुकसान सहन करावे लागले.
या प्रकल्पात रस्त्यासाठी काही जागा सोडण्यात आली होती. ही जागा प्रादेशिक रस्त्यासाठी असेल असे त्यात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार या रस्त्याची जागा राज्य सरकारच्या नावे अर्थात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे करण्यात आली होती. मात्र जानेवारीमध्ये ही जागा डीएसके वर्ल्डमन प्रायव्हेट लिमिटेड अर्थात हेमंती दीपक कुलकर्णी यांच्या नावे करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांना पैसे परत मिळत नसताना राज्य सरकार डीएसकेंवर का मेहेरबान झाली आहे, यात महसूल यंत्रणा नक्कीच गुंतली आहे, असा आरोप करत या सबंध प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
''डीएसके प्रकल्पातून अनेक गुंतवणूकदारांना माेठा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने डीएसके यांच्या सर्व मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांना दिला देणे अपेक्षित असताना राज्य सरकारने तळेगावातील रस्त्याची जागा डीएसके यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या नावावर करून दिली. यात नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचे दिसून येत आहे. - संजय आश्रित, गुंतवणूकदार''