जमीनमाफिया बनणारा गुंड पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:10+5:302021-01-16T04:14:10+5:30
हवालदार सुनील पवार : गुंडाशी संग आला अंगलट लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर येथील जमिनीसाठी गुंडांशी संग करण्याचा ...
हवालदार सुनील पवार : गुंडाशी संग आला अंगलट
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बाणेर येथील जमिनीसाठी गुंडांशी संग करण्याचा प्रयत्न एका पोलीस हवालदाराच्या चांगलाच अंगाशी आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात असताना बाणेरमधील जमिनीचे ‘डील’ करणारा पोलीस हवालदार सुनील सुदाम पवार याला पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी निलंबित केले आहे.
हवालदार सुनील पवार सध्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणुकीला असतानाही बाणेर येथील जागेबाबत पैशांची देवाण घेवाणीबाबत तो चर्चा करताना प्रथमदर्शनी आढळला.
बाणेर येथील स़ नं. ३३/२ पैकी १ येथील २३.१० गुंठे जागेवर काही गुंडांनी पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे ११ जानेवारी २०२१ रोजी ताब्यात घेतली होती. त्याबाबत अमोल पांडुरंग कळमकर (रा. माधवबाग सोसायटी, बाणेर) यांनी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केली.
बाणेर येथील जमिनीवर पोलिसांच्या साहाय्याने काही गुंडांनी जबरदस्तीने अतिक्रमण करून ताबा घेतला आहे. त्याबाबत चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेण्यात न आल्याने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. ह्रषीकेश बारटक्के यांनी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यांची चौकशी केली असताना त्यांनी त्यांच्याकडे असलेले ऑडिओ व व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखविले. त्यात हवालदार सुनील पवार हे त्या जागेचा ताबा मिळवण्याकरीता पैशांची देवाण घेवाणीची चर्चा करत असल्याचे दिसत आहे. तसा ह्रषीकेश बारटक्के यांचा सविस्तर जबाब घेण्यात आला आहे.
चौकट
‘खल’रक्षणाय
याबाबत झालेली चौकशी व मिळालेले ऑडिओ व व्हिडीओ रेकॉर्डिंग यावरून हवालदार सुनील पवार यांचे वर्तन हे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यांचे वर्तन बेशिस्त व बेजबाबदारपणाचे असून पोलीस दलास अशोभनीय आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नित्पात, हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य असताना सुनील पवारचे वर्तन नेमके त्याच्या विरुद्ध आढळल्याने सुनील पवारला निलंबित करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी काढला.